मुंबई : राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून प्रामुख्याने माघारी फिरत असतो मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याने राज्यात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. देशाच्या पूर्व व मध्य भागात आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळेल. दरम्यान, राज्यात देखील सर्वत्र पावसाचा अंदाज आहे.
आज आणि उद्यासाठी कोकणाला यलो अलर्ट
कोकणात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज आणि उद्यासाठी कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 15 मिमी ते 115 मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज आहे.
मुंबईत पुढील तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज
मुंबईबद्दल बोलायचं झालं तर आजपासून पुढील तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे. आज ऊन-पावसाचा खेळ बघायला मिळू शकतो. तर उद्या आणि परवा काही ठिकाणी कालांतराने मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान, सखल भागात पाणी साचण्याची शक्यता कमीच असल्याचंही बोललं जातंय.
मध्य महाराष्ट्रातही आज ठिकठिकाणी पावसाची हजेरी बघायला मिळेल. विजांच्या कडकडाटासह घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुसळधार पावसासोबतच वाऱ्यांचा वेग देखील घाट माथ्यावर अधिक असणार आहे. घाट माथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस असला तरी पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
पूर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज
दक्षिण मराठवाड्यात प्रामुख्याने उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तिन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून वाऱ्यांचा वेग अधिक असण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात दुपारनंतर काही ठिकाणी मुसळधार पावासाला सुरुवात होईल. पूर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी अपेक्षित आहे तर काही ठिकाणी विजांच्याकडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान देखील सर्वत्र पाऊस बघायला मिळू शकतो.