Maharashtra Politics : कसाबलादेखील एवढ्या बंदोबस्तात आणलं नव्हतं, मात्र, त्या आमदारांना एवढ्या बंदोबस्तात आणले गेले असा टोला माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे. आजपासून विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. त्यासाठी विधानभवन परिसरात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. 


शिवसेना नेते आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, विधानभवन परिसरात एवढा कडेकोट बंदोबस्त आहे. हा बंदोबस्त नेमका कशासाठी आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदारांना एवढ्या बंदोबस्तात विधानभवनात आणण्यात आले. कशासाठी बंदोबस्त आहे, त्या आमदारांना पुन्हा कोणी गुवाहाटीला नेणार आहेत का असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला. कसाबच्या वेळीही एवढा बंदोबस्त नव्हता. मात्र आमदारांना आहे असा टोलाही त्यांनी लगावला. 


महाविकास आघाडी म्हणून एकत्र


महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेत एकत्रच बसणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हे विधानसभेचे पहिलेच विशेष सत्र आहे. या अधिवेशनात शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिवसेनेचे आमदार आमनेसामने येणार आहेत. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हिप लागू होणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.


आम्हाला धोका दिला, मुंबईला धोका देऊ नका


आम्हाला धोका दिला पण मुंबईला धोका देऊ नका असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारला केले. आरेचे जंगल मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग, गोरेगाव पहाडी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेच्या पर्यायावर विचार सुरू होता. या नव्या सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईवर घाला घालणारा असल्याचे त्यांनी म्हटले. आमचा राग मुंबईवर काढू नका असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. आरेचा मुद्दा हा फक्त जंगलाचा नाही तर जैवविविधतेचा आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले. 


भाजपला काय मिळाले ?



शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करत राज्यात नवीन सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटाने आपल्याकडे शिवसेनेच्या 39 आमदारांसह 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आज राज्यपालांच्या आदेशानंतर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडत आहे. आज विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होणार असून त्यानंतर बहुमत चाचणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, राजन साळवी हे शिवसैनिक आहेत. तर, राहुल नार्वेकर हे माजी शिवसैनिक आहेत. दोन्ही ठिकाणी शिवसैनिक आहेत. त्यामुळे भाजपला काय मिळाले, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.