Maharashtra Politics: विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून (3 जुलै) सुरुवात झालीय. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) बंडखोर आमदरांवार राऊतांनी निशाणा साधलाय. "बाळासाहेब ठाकरेंचे नाव म्हणजे आग, त्यामुळं आगीशी खेळू नका, असा विरोधकांना इशारा दिलाय. राज्याची जनता महाराष्ट्रातील नव्या सरकारला स्वीकारणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना पुढे जाणार आहे. शिवसेना खचणार नाही तर, लढणार", असंही त्यांनी म्हटलंय.
शिवसेना भविष्यात या राज्याचं नेतृत्व करेल
नुकताच संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटलंय की, "बाळासाहेब ठाकरेंचं नाव हे आग आहे, त्यामुळं आगीशी खेळण्याचा प्रयत्न करु नका. आतापर्यंत ज्यांनी आगीशी खेळण्याचा प्रयत्न केलाय त्यांचं केवळ हात पोळले नाहीत, तर त्यांची राजकीय कारकीर्दही पोळली आहे, असंही सांगत त्यांनी भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे. त्यामुळे हे जे आमचे आमदार तुम्ही कैद करून ठेवलेले आहेत किंवा तुमच्या ताब्यात ठेवलेले आहेत जनता त्यांचा निर्णय घेईल. त्यांच्याविषयी बोलणं आता आम्ही थांबवलंय आता ते महाराष्ट्रात आले आहेत. त्यांना त्यांच्या मतदार संघातही जायचं आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला असेल. त्यांना लखलाभ ठरो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुढे घेवून जावू आणि हीच शिवसेना भविष्यात या राज्याचं नेतृत्व करेल हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो."
महाराष्ट्राच्या मातीत ढोंगीपणाला, खोटेपणाला स्थान नाही
“महाराष्ट्राच्या मातीत कधी ढोंगीपणाला, खोटेपणाला स्थान दिलं गेलं नाही. शिवसेनेच्या पाठीत आतापर्यंत अनेकांनी अशाप्रकारचे वार केले, परंतु ते वार पचवून शिवसेना उभी आहे. भाजपाला महाराष्ट्रात स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी तेव्हाही बाळासाहेब ठाकरेंची गरज लागली होती. आजही भाजपला बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेले शिवसैनिक मुख्यमंत्री पदापासून ते विधानसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत बसवावे लागत आहेत. यातच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं महत्व अधोरेखीत होतय”, असंही संजय राऊतांनी म्हटलंय.
हे देखील वाचा-
- Amravati Murder Case : अमरावती खून प्रकरणात मोठा खुलासा, याआधी उमेश कोल्हेंच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न
- Maharashtra Politics : नक्की आदेश कोणाचा? विधानभवनातील शिवसेना कार्यालयाला टाळे
- Monsoon News : जुलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, उद्यापासून पावसासाठी पोषक वातावरण