Maharashtra Politics:  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गट भाजपनं एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारनं सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव 164 विरुद्ध 99 अशा मतांच्या फरकानं जिंकला. शिंदे-फडणवीस सरकारनं बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत बोलण्यासाठी उभे राहिलेल्या शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) उभे राहिले. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे घेण्याचं आवाहन केलं.


भास्कर जाधवांचं एकनाथ शिंदेंना आवाहन
"एकनाथ शिंदेजी हे तुम्हाला लढवत आहेत. रक्तपात शिवसेनेचा होईल. शिवसैनिक घायाळ होतील. 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्यावर यांचं प्रेम नाही, तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागं घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत, तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल", असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय.


एकनाथ शिंदेंवर मोठी जबाबदारी
पुढे भास्कर जाधव म्हणाले की, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगायेत मी शिवसेनेचा आहे. हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे, आनंद दिघेचा वारसदार आहे.  आज आपण बाळासाहेब, आनंद दिघे, शिवसेनेचं नाव सांगताय, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे." 


महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारताची, रमायणाची पुनरावृत्ती होणार
"माणसानं एखादी लढाई हातात घेतली की, थांबायचं कुठं? हे ज्याला माहिती असतं तो खरा योद्धा! या महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारताची, रमायणाची पुनरावृत्ती होणार आहे. सख्खे दोन भाऊ एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवशीपासून प्रत्येक चाल, प्रत्येक कृती ही सरकार उलथून लावण्याची होती", असंही भास्कर जाधवांनी म्हटलंय. 


हे देखील वाचा-