मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेतील दोन आमदारांवरील कारवाई करणार का, हा प्रश्न  चार दिवसांपासून विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये पत्रकार संदीप महाजन यांना मारहाणी करण्यात आली. त्यावरून आमदार किशोर पाटील यांच्यावर सडकून टीका करण्यात येतेय. तर दुसरीकडे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाचा थेट अपहरण प्रकरणात सहभाग आहे. याप्रकरणी आता संबंधित आमदारांवर कारवाई का होत नाही? असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केला आहे.  


राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. आता सरकारमध्ये अजित दादा गटाची एन्ट्री झाली आहे.  मात्र एकनाथ शिंदेंचा आमदारांचे कारनामे काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत.  मुख्यमंत्र्यांच्या आमदारांनी  मागील वर्षभरात त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. कधी अब्दुल सत्तार यांचे कारनामे असतील तर कधी शिंदेंच्या आमदारांची वादग्रस्त वक्तव्ये यामुळे मुख्यमंत्री शिंदेंची डोकेदेखी वाढल्याचे अनेकदा पाहिले आहे. आता देखील शिंदेचे दोन आमदार चांगलेच अडचणीत आले आहेत.  एक आमदार मुंबईतल्या मागाठण्याचे आहेत   तर दुसरे आहेत पाचोऱ्याचे..पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जळगावमधील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे किशोर पाटील यांची अलीकडेच पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती.


 दरम्यान या मारहाणीच्या घटनेचा आपल्याशी सबंध नसल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे. तर लोकप्रतिनिधींनी असे करण योग्य नसल्याचे म्हणत याचे समर्थन कोणी करणार नसल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. 


 एकीकडे जळगाव पत्रकार मारहाण झालेली असताना दुसरीकडे शिंदेचे मुंबईतील आमदार  प्रकाश सुर्वे हे त्यांच्या मुलामुळे अडचणीत आलेत. प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी गोरेगाव येथून एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला दहिसरमध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयामध्ये घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही तर जर तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली  तर आम्ही तुम्हाला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी दिलाचा आरोप फिर्यादीच्या वकिलांनी केला आहे. राज सुर्वे यांना अपहरण केसमध्ये वाचवण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्याचा दावा शेट्टींनी केला आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरोधात अपहरणाची तक्रार दाखल करत कारवाईची मागणी  केली आहे. 


आधीच राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप शिंदे-फडणवीस पवार सरकारवर विरोधक करत आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांवर असे आरोप होत असल्याने येत्या काळात हा मुद्दा गाजून शिंदेचे दोन्ही आमदार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.