Maharashtra Politics Shankarrao Gadakh: महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या आधीपासून शिवसेनेसोबत असलेले माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघाचे आमदार असलेले शंकरराव गडाख यांनी तूर्तास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याची घोषणा केली आहे. न्यायालयीन निर्णयानंतर राजकीय परिस्थिती शांत झाल्यानंतर पुन्हा एकत्रित बसून निर्णय घेऊयात असे म्हणत विकासाचं काम होणंही महत्त्वाचं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


आमदार शंकरराव गडाख यांनी आज कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा की शिंदेगटासोबत जायचं याबाबत  द्विधा मनस्थिती होती, असेही त्यांनी म्हटले. हे सरकार पडणार असल्याची आधीपासूनच चर्चा सुरू होती. शिवसेनेचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमुळे नाराज होते, असेही त्यांनी सांगितले. 


गुवाहाटीमधून फोन 


शिवसेनेत बंड झाल्यानंतर अनेक आमदार सुरतमार्गे गुवाहाटीमध्ये दाखल झाले होते. गुवाहाटीमधून मलादेखील फोन आले होते असेही गडाख यांनी यावेळी सांगितले. अनेक आमदार येणार आहेत तुम्हीही या असा फोन आला होता. काय निर्णय घ्यावा याची मनात घालमेल होती सुरू होती. राजकारणात केवळ फायदा तोटा बघून चालत नाही असेही त्यांनी म्हटले. 


उद्धव यांना साथ


आपण सत्तेत असो नसो उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. असे राजकीय प्रसंग येत असतात. घरातलेच आमदार सोडून गेल्याने उद्धव ठाकरेंनीच हे केलंय का अशीही चर्चा सुरू होती असेही त्यांनी सांगितले. आपण ठाम राहिलो तर निर्णय चुकतो का, अशीही धाकधूक वाटत होती असेही त्यांनी सांगितले. कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत याचा आनंद वाटत असल्याचे गडाख यांनी सांगितले. मंत्रीपद गेल्यापेक्षा कामं थांबल्याचं दु:ख असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी हा प्रसंग संयमाने घेतला, तसं आपणही संयमानं पुढं जावू असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.