Jalgaon : जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पुन्हा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil)  यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. उद्या माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांचा मुंबईत अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शरद पवार गटाला मोठा हादरा बसला आहे. 

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला गळती

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला गळती लागली असून माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. आता त्या पाठोपाठ राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. ते उद्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, उमेश पाटील यांनी त्यांचा राजीनामा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे पाठवला आहे.

दोन माजी मंत्री उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार 

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. याच कारणामुळे वेगवेगळ्या पक्षांत इन्कमिंग आणि आऊटगोइंग चालू झाली आहे. आता जळगावमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री सतीश पाटील यांच्यासोबतच माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप वाघ आणि दिलीप सोनवणे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. पुढील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान होणाऱ्या मेळाव्यात या नेत्यांचा प्रवेश करण्याबाबतचा विचार होता. मात्र, सुरुवातीला मुंबईत प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश होऊन कार्यकर्ते व इतरांचा जाहीर प्रवेश अजित पवारांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी देवकर यांनी अजित पवार गटात येण्यासाठी चाचपणी केली होती. तेव्हा काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. आता मात्र, या विरोधाला वरिष्ठांकडून शमविण्यात आले असून, माजीमंत्री गुलाबराव देवकर यांचा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Chhagan Bhujbal : शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार? छगन भुजबळ म्हणाले, 'पंचांग वगैरे बघतो, जळगावमध्ये चांगले ज्योतिषी....'