Maha Vikas Aghadi : आज (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Naga) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही  सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलंय.


महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार


आजच्या या सभेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी केली जात असतानाच शहरातील किराडपुरा भागात घडलेल्या घटनेमुळं सभेला परवानगी मिळणार की नाही अशा चर्चा सुरु होती. पण अखेर पोलिस प्रशासनाने या सभेला सशर्त परवानगी दिली आहे. आजच्या या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित असणार आहे.


काही अटींसह सभेला परवानगी, सुत्रांची माहिती 


आजच्या या सभेला परवानगी देताना पोलिस प्रशासनाने काही अटी घालून दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये कार्यक्रमाच्या वेळेत आणि ठिकाणात कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी, सभेला येताना आणि परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. सभास्थानी कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये, यासह अन्य अटीवर सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


सभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 


दरम्यान, संभाजीनगरमध्ये सध्या तणावग्रस्त वातावरणान आहे. त्यामुळं या सभेवेळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फैजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील तणावग्रस्त वातावरणानंतर राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोपही केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं राजकीय वातावरण देखील तापलं होतं. दरम्यान, आजच्या या महाविकास आघाडीच्या सभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असून, राजकीय नेते आज काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  


भाजप-शिंदे गटाची सावरकर गौरव यात्रा 


छत्रपती संभाजीनगर शहरात  आज भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान शहरातील पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात ही यात्रा काढली जाणार आहे. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Mahavikas Aghadi Sabha : 'मविआ'च्या सभेनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील चौक झाले भगवेमय