Sanjay Kute : महाराष्ट्रातील राजकरणात वेगाने घडोमोडी घडताना दिसत आहेत. कालपर्यंत सोबत असणारे एकनाथ शिंदे रातोरात पक्षाचे 30 पेक्षा अधिक आमदार घेऊन गुजरातला गेले आहेत. विशेष म्हणजे कट्टर शिवसैनिक म्हणून समजले जाणारे अनेक आमदार आज उद्धव ठाकरेंच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे हे सूरतमधील एका हॉटेलमध्ये थांबले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपचे आमदार संजय कुटे (Sanjay Kute) हे सुरतमध्ये दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन संजय कुटे हे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी संजय कुटे यांच्याशी बैठक सुरु असल्याची माहिती मिळते आहे.


संजय कुटे नेमके कोण?



  • संजय कुटे हे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे भाजपचे आमदार आहेत.

  • जळगाव जामोद मतदारसंघातून तब्बल चार वेळा संजय कुटे आमदार झाले आहेत.

  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे संजय कुटे हे निष्ठावंत सहकारी मानले जातात.

  • देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संजय कुटे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती.

  • भाजपचे एकनिष्ठ असणारे नेते म्हणून कुटे यांची ओळख आहे. 

  • संजय कुटे हे ओबीसी चेहरा आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.

  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कुटे यांनी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वाती वाकेकर यांचा पराभव केला होता.

  • वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या संजय कुटे यांच्यावर दिल्या होत्या.

  • राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी पोलिंग एजंट म्हणून संजय कुटे यांच्याकडे जबाबदारी दिली होती.

  • आता सुरतमध्ये देखील चर्चा करण्यासाठी संजय कुटे यांना पाठवण्यात आलं आहे. 


विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे 25 शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.


नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


महत्वाच्या बातम्या: