Kirit Somaiya On Kishori Pednekar : भारतीय जनती पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यामधील वाद सध्या तरी थांबायचं नाव घेत नाही. किरीट सोमय्या यांनी एकीकडे किशोरी पेडणेकरांवर जोरदार टीका केलीय. तर दुसरीकडे पेडणेकरांच्या सासूचे निधन झाल्यामुळे सोमय्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या सासूबाई श्रीमती विजया पेडणेकर (Vijaya Pednekar) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. किशोरी पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या SRA घोटाळ्याच्या आरोपानंतर चौकशी झाली होती. किशोरी पेडणेकरांवर होणाऱ्या आरोपांमुळे वयोवृद्ध विजया पेडणेकर यांनी धसका घेतल्यामुळे हा मृत्यू झाला असा आरोप आता पेडणेकर कुटुंबीयांनी केला. यावर सोमय्यांना प्रतिक्रीया दिली आहे.


'कुलुप घेऊन जात नौटंकी का करता?' - किरीट सोमय्या


कथित एसआरए घोटाळ्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. ते म्हणाले, किशोरीताईंना 'झोपू' ची नोटीस मिळाली आहे का? पेडणेकरांच्या ताब्यात गाळे आहे, त्यासाठी एसआरएनं नोटीस पाठवली आहे. गंगाराम बोमाया वडलाकोंडा यांना एसआरएनं लिहीत विचारलंय की, तुम्ही किशोरी पेडणेकरांना राहायला जागा दिली. सोमय्या पुढे म्हणाले, माझ्या तक्रारी उद्धव ठाकरेंनी दाबल्या होत्या. शिंदे सरकारनं आता सांगितलंय कायदेशीर जे असेल ते करा. तुम्ही 2017 च्या शपथपत्रात लिहिलंय की, तुम्ही तिथे राहात होत्या. कुलुप घेऊन जात नौटंकी का करता? असा सवाल सोमय्या यांनी पेडणेकरांना विचारलाय. तसेच संजय अंधारी यांना हजर करा, आव्हानही सोमय्या यांनी पेडणेकर यांना दिलंय


'ती' कंपनी किशोरी पेडणेकरांची - सोमय्या
किरीट सोमय्या म्हणाले, संजय अंधारी यांना देखील एसआरएनं नोटीस पाठवलीय आणि तसेच किशोरी पेडणेकर यांनी जागा दिली असा उल्लेख एसआरएनं केलाय. किश कॉर्पोरेट कंपनीला ही जागा दिलेली असून किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस कंपनी ही किशोरी पेडणेकरांची आहे, त्यांच्याकडे शेअर्स होते, असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. किशोरी पेडणेकर यांना चॅलेंज करतो, संजय अंधारीला हजर करा, दोन पैकी खरा कोण आहे, फोटो वेगवेगळे आहेत. किशोरीताईंनी मानलेल्या भावाला संजय अंधारी म्हणून उभं केलं. सुनिल कदमला संजय अंधारी म्हणून उभं केलंय असा आरोप सोमय्यांनी केला आहे.  


गरीब झोपडपट्टीवाल्यांचे गाळे घेतलेत हे ही खरं - सोमय्या


सोमय्या म्हणाले, किशोरीताईंच्या घरात निधन झालं, याबद्दल आम्हाला दु:ख आहे, मात्र गरीब झोपडपट्टीवाल्यांचे गाळे घेतलेत हे ही खरं आहे. आता त्याची चौकशी सुरु झाली आहे, त्याचं उत्तरं द्यावं लागणार. कोर्टात ॲफिडेव्हिट दाखल केलंय, माझा तोच मुद्दा उद्धव ठाकरे दाबत होते. किशोरीताईंना आता नोटीस पाठवली आहे, तर मग आता त्याला कोर्टात जात किशोरीताईंनी चॅलेंज करावं असं सोमय्या म्हणाले. 


"किशोरी पेडणेकरांनी कोर्टात सिद्ध करावं"
महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या, भारत सरकारला ॲग्रीमेंटची कॉपी कोणी दिली? किशोरी पेडणेकरांनी दिली नसेल तर त्यांनी सिद्ध करावं. संजय अंधारीच्या जागी मानलेला भाऊ म्हणून संजय कदमला उभं केलं, यासंबंधी फौजदारी कारवाई व्हायला हवी. फौजदारी कारवाईसाठी पोलिसांशी बोललो आहे, तक्रारीचा पाठपुरावा मी 2-4 दिवसात करणार असं सोमय्या म्हणाले.



सोमय्यांनी केलेले आरोप काय?
गोमाता नगर एसआरए प्रकल्पातील गाळ्यांबाबत किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर सहा गाळे हडपल्याचे आरोप केले आहेत. याच प्रकल्पात फ्लॅट देतो असे सांगून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातही आरोपींच्या जबाबात किशोरी पेडणेकरांचे नाव समोर आले आहे. मात्र, जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याकरता खोटे आरोप केले जात असल्याचा दावा किशोरी पेडणेकरांनी केला आहे. याबाबत किशोरी पेडणेकर लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे.