Uddhav Thackeray : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृतरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरेंची पुढील लढाई सुप्रीम कोर्टात आहे. पण पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मास्टरप्लॅन तयार केला आहे. यामध्ये प्रामुख्यानं दोन मोहिमा राबवण्यात येणार आहेत. उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सवांद साधला. आपण 28 फेब्रुवारीपर्यंत मशाल हे निवडणूक चिन्ह वापरू शकतो, याची माहिती उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिली. तसंच मशाल चिन्हही काढून घेण्यात आलं, तर आपल्या मनात आणखी दहा चिन्हं असल्याचंही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईच्या शिवसेना भवनात जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील पक्षाची पडझड रोखण्यासाठी आणि पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी राज्यात शिवसंपर्क अभियान आणि शाखा संपर्क अभियान सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांना गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार ठाकरे गटाचे नेते आधी महाराष्ट्र दौऱ्यावर जातील. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यांचं आयोजन करण्यात येईल.
उद्धव ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी ते म्हणाले की, आता जर जागे नाही झालो तर 2024 मध्ये हुकूमशाही येईल. मिंधे गटाला नाव व चिन्हे दिले. कालांतराने त्यांच्यावरील जुन्या केसेस उघडणार आणि शिवसेना संपवायचा प्लॅन आहे. 28 तारखेपर्यंत मशाल हे चिन्ह वापरू शकतो. हे चिन्ह जरी काढून घेतले तर अजून 10 चिन्हे माझ्या मनात आहेत, असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार आहेत. नेत्यांना राज्यभर दौरे करण्याची जबबादारी दिली आहे. सामन्य नागरिकांपर्यंत हा विषय नेण्यास सांगितले आहे. नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाल्यास देशात यादवी माजेल, उन्माद निर्माण होईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरेंचा मास्टरप्लॅन काय?
ठाकरेंचे प्रमुख नेते करणार महाराष्ट्र दौरा !!
गाव तालुका जिल्हा पिंजुन काढायचे उद्धव ठाकरेंचे नेत्यांना आदेश.
आधी नेते करणार दौरा त्यानंतर उद्धव आणि आदित्य ठाकरे जाणार दौऱ्यावर.
विभागवार ठरणार ठाकरेंच्या प्रमुख नेत्यांचे दौरे.
दौ-यांवर जाऊन ठाकरे गट आपला गड मजबूत ठेवण्याचा करणार प्रयत्न करणार आहे.
शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यभरातील जिल्हा प्रमुख यासोबतच संपर्क प्रमुख यांची बैठक सुरू
पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीनं दोन अभियान राबवले जाणार.
बैठकीत शिवसंपर्क अभियान आणि शाखा संपर्क अभियान सूरू करण्याचा निर्णय- सूत्र.
पक्षाची पडझड रोखून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ठाकरे गटाचे अभियान.