Maharashtra Political Crisis : राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागले आहे. मात्र, या दरम्यान आता लोकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्राबाबत चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत आणि प्रताप सरनाईक या दोन्ही नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही फेब्रुवारी महिन्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक पत्र लिहीले होते. या पत्रात राऊत यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करा अन्यथा तुमची अवस्था लालू प्रसाद यादव यांच्यासारखी करू असे म्हटले होते. ही धमकी देण्यासाठी काहीजण भेटले होते असा दावाही राऊत यांनी केला. सरकार पाडण्यासाठी नकार दिल्यास मोठी किंमत मोजावी लागेल असेही राऊत यांनी म्हटले होते. महाराष्ट्र सरकारमधील दोन मोठे मंत्री तुरुंगात जाणार असल्याचीही धमकी देण्यात आली होती, असे राऊत यांनी म्हटले होते. संजय राऊत यांच्या या लेटर बॉम्बची मोठी चर्चा झाली होती. संजय राऊत हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत.
संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटले?
संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करताना म्हटले की, राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले. माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात असेही राऊत यांनी म्हटले.
प्रताप सरनाईक यांच्या पत्राची चर्चा
ठाण्यातील शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले प्रताप सरनाईक हेदेखील सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. प्रताप सरनाईक यांनी मागील वर्षी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहित खळबळ उडवून दिली होती. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने आता भाजपसोबत जुळवून घ्यावे अशी विनंती केली होती. हे पत्र लिहिण्याआधी प्रताप सरनाईक यांची केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली होती.
प्रताप सरनाईक यांच्या पत्रात काय म्हटले?
प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटले होते की, कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार" झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल.
पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही सरनाईक यांनी पत्रात म्हटले होते.