मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात उद्या होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी मंगळवारी होण्याची शक्यता आहे. न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती उद्या उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे आता यावर मंगळवारी सुनावणी होते का हे पाहावं लागेल.


या आधी राज्यातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात  4 ऑगस्टला शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे गेली आहे. पण यामुळे शिवसेनेसमोर एक अडचण निर्माण होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला पक्ष आणि चिन्हासंबंधी त्यांचं मत मांडण्यासाठी 23 ऑगस्ट ही तारीख दिली होती. 


 






सरन्यायाधीश एस व्ही रमणा हे या 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. ही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्याने ही आशा आता मावळत चालली आहे. याचा फायदा शिंदे गटाला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


निवडणूक आयोगाचीही 23 ऑगस्टपर्यंत मुदत
शिवसेना कुणाची या मुद्द्यावर आता निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु झाली आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटानं चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण आयोगानं दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. याची मुदत 23 ऑगस्ट असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी देखील 23 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. हे प्रकरण पाच किंवा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवणं, खरी शिवसेना कोणाची, तसंच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत अशा मुद्दांवर सुनावणी होईल. या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशभराचं लक्ष लागलं आहे. हे यापूर्वी तीन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे.