मुंबई: शिवसैनिक म्हटल्यानंतर संघर्ष किंवा लढा हे काही नवीन नाही. बंड करणाऱ्यांनी मुख्यमंत्री आजारी असतानाची वेळ निवडली, त्यामुळे आता आपण लढायचं आणि जिंकायचं असं राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते नगरसेवकांशी संवाद साधत होते. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार हे देशासाठी महत्त्वाचं असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. या सरकारच्या काळात 6 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर लोकांनी प्रेम केलं. देशभरातून उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं जातंय. राजकीय व्यक्ती नाही तर सर्वसामान्यातून कौतुक केलं जातंय. राज्यातले महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. 

बंड केलेले आमदार परत आले तर त्यांना घेऊयात असं सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की,  सत्ताधारी पक्षातून विरोधकांमध्ये जाण्यासाठी हे बंड आहे. सुरतला जाऊन बंड का करायचं? काही असेल तर त्यांनी ते समोर येऊन बोलायला हवं होतं. महाराष्ट्राबाहेर जाऊन का सांगताय? आता यापुढे आपल्याला लढायचं आहे. प्रत्येक लढाई ही आता जिंकण्यासाठी करायची. जे आपल्याविरोधात आहेत त्यांच्याविरोधात लढाई करायची आहे. आपल्याला आयपीएलसारखे प्राईस टॅग लावलेले शिवसैनिक नकोत, तर प्राईसलेस शिवसैनिक हवेत. त्यामुळे एकजुटीचा निर्धार करुयात. 

मुख्ममंत्री काय म्हणाले?शिवसेना ही मर्दांची सेना आहे. ज्या-ज्या वेळी आपल्याला कोणी आव्हान दिलं त्यावेळी आपण त्यांना संपवून पुढं गेलोय. गद्दारांना शिवसेनेत स्थान नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही निवडून आणलेल्यांना फोडू शकाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडून दाखवा असं थेट आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला आव्हान दिलं. वर्षावर आता माझा शिवसैनिक जाईल असंही ते म्हणाले.  

जो शिवसैनिक माझ्यासोबत राहिल त्याच्या सोबतीने मी पुन्हा शिवसेना उभी करेन असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "शेराला सव्वाशेर मिळतोच. शिवसेना ही तळपणारी तलवार आहे, ती म्यानात घातली तर गंजते, आणि बाहेर काढलं तर तळपते. तीच आता वेळ आली आहे. शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण केलं. आपल्याच लोकांनी पाठित खंजीर खुपसलं आहे."