यवतमाळ : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड (sanjay rathod) गुवाहाटीवरून गुरूवारी यवतमाळमधील धामणगाव येथे येणार आहेत. धामणगावात 30 जून रोजी संजय राठोड यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. संजय राठोड हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर गुवाहाटीवरून थेट धामणगाव(देव) येथे पोहचणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. बंड करून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमधील संजय राठोड हे पहिलेच आमदार आहेत, जे महाराष्ट्रात येणार आहेत.  


धामणगाव येथील माऊली सागर’सह विविध विकासकामांचे 30 जून रोजी  लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी संजय राठोड उपस्थित राहणार आहेत. लोकापर्ण सोहळ्यानंतर राठोड नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. 


यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव येथे आमदार संजय राठोड हे गुरुवारी 30 जून रोजी विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. संजय राठोड एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रथमच ते महाराष्ट्रात येणार असल्याने त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


शिवसैनिक आक्रमक
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांकडून मोर्चा काढण्यात येत आहे. काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केल्याची देखील काही प्रकरणे समोर आली आहेत. आज वणी येथे देखील शिवसैनिकांनी या बंडोखोर आमदारांच्या विरोधात मोर्चा काढला. यावेळी संजय राठोड, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आता 30 जून रोजी शिवसैनिक कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   


संजय राठोड  हे यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर दोन-तीन दिवसांनी संजय राठोड देखील त्यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. याबरोबरच संजय राठोड यांनी परत शिवसेनेत यावे अशी साद बंजारा समाजाने घातली आहे.