Maharashtra Political Crisis Subodh jaiswal on CM Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. शिवसेनेचे नेते आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे बाण या दरम्यान सतत सुरु आहेत. आता गुवाहाटीत शिंदे गटात असलेले अपक्ष आमदार आशिष जायस्वाल यांनी देखील मुख्यमंत्र्यांना काही सवाल केले आहेत. एबीपी माझाशी संवाद साधताना जायस्वाल यांनी म्हटलं की, तुम्ही वर्षा सोडलं, तुम्ही मंत्रालयात जात नाही आणि मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही. मग राज्य कोण चालवतंय? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. 
 
आज आशिष जायस्वाल यांच्या विरोधात रामटेकला निषेध सभा घेण्यात येणार आहे. माजी खासदार प्रकाश जाधव हे करणार ह्या निषेध रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. यावर जायस्वाल म्हणाले की, मी तुमच्या पक्षात आहे का की तुम्ही माझा निषेध कराल? मी अपक्ष आहे, मला संविधानाने अधिकार दिला आहे की मी कुठेही जाऊ शकतो. मी 2019 ला बंडखोर होतो, आज नाही. तेव्हा माझ्या निषेध सभा घ्यायच्या होत्या, तेव्हा घेतल्या का? तेव्हा तर तुम्ही भाजप-शिवसेनेसाठी घेतल्या. आज काय निषेध करता, असं त्यांनी म्हटलं आहे. 


निधी वाटपावरुन महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर केला होता गंभीर आरोप 

आमदार जायस्वाल यांनी निधी वाटपावरुन महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केला होता.  निधी वाटप करताना महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री मोबदल्याची आणि हिस्सेदारीची अपेक्षा ठेवतात का? या प्रश्नावर शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी गंभीर आरोप केला होता. या संदर्भात मला असेच अनुभव आले आहेत आणि अनेक आमदारांना असेच अनुभव आलेले आहेत. हे अनुभव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार असून जर त्यानंतरही बदल झाले नाही तर आम्ही वेगळा विचार करु, असे आमदार आशिष जयस्वाल म्हणाले होते. मोबदल्याची किंवा हिस्सेदारीची अपेक्षा ठेवणारे मंत्री कोण या प्रश्नावर मात्र आशिष जयस्वाल यांनी थेट उत्तर दिले नव्हते. या क्षणाला यापेक्षा जास्त मीडियासमोर बोलणं योग्य वाटत नाही. राज्यसभा आणि विधानपरिषदेची निवडणूक झाली आणि तोपर्यंत या मुद्द्याचा सोक्षमोक्ष झाला नाही तर त्यानंतर या मुद्द्यावर बोलू. तुम्ही वाट बघा, योग्य वेळ आल्यानंतर या मुद्द्याचा समाचार निश्चितच घेईन, असे जयस्वाल म्हणाले होते.