Maharashtra Political Crisis : शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभु यांच्या नियुक्तीला विधीमंडळानं मान्यता दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यासाठी मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, शिंदे गटाला मान्यता मिळावी यासाठी झिरवळांना कालच पत्र पाठवलं होतं. 


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विधिमंडळ पक्षावर वर्चस्वासाठी कायदेशीर संघर्ष सुरु झालाय आणि या लढाईत विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना विधीमंडळ गट नेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनील प्रभु यांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मान्यता दिलीय. एकनाथ शिंदे यांनी गटनेते असल्याचा दावा करत प्रतोदपदी भारत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं पत्र दिलं होतं. पण विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं एकनाथ शिंदे यांना कोर्टात दाद मागावी लागू शकते.


बंड केल्यानंतर शिवसेनेनं कारवाई करत एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करत शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. अशातच आता शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना विधीमंडळानं मान्यता दिल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मान्यता दिल्याचंही सूत्रांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे आता शिंदे गटाला न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. अशातच आता एकनाथ शिंदे आता कोर्टात धाव घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो : नरहरि झिरवाळ


एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं असताना काही दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. कायद्यानुसार, पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो. गटनेत्यानं प्रतोदांची नेमणूक करायची असते. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. ते पत्र मी स्वीकारलं आहे, असं झिरवाळ यांनी म्हटलं होतं.


शिवसेना पक्ष प्रतोदपदी आता आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात असल्याची माहिती बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिली होती. एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं होतं. शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी एक आदेश काढला होता. तो आदेश अवैध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं.