नाशिक: एकीकडे राज्यातील राजकारणात उलथापालथ सुरू असून यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यातच मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा ताप वाढविल्याने शिवसेना एकटी पडते की काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत असताना नाशिकमध्ये 'उद्धव साहेब, तमाम शिवसैनिक तुमच्या सोबत' अशा आशयाची बॅनर बाजी करण्यात आली आहे. 


सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला कात्रजचा घाट दाखवला. या निवडणुकीतही अपक्षांनी भाजपचे 'लाड' पुरवले आणि शेवटी देवेंद्र फडणवीस गेम फिनिशर ठरले. तर निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे 'नॉट रीचेबल' राहत शिवसेनेला मोठा धक्का दिला. यामुळे शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 


या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून आमदारांची बैठक घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील बैठक घेत आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास अस्ताव्यस्त होतानाच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसैनिक एकवटले असून नाशिकमधील शिवसैनिकांनी बॅनर बाजी करून आम्ही शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले आहे.


नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरात शिवसैनिक योगेश बेलदार यांनी हे बॅनर लावले असून सकाळपासून सुरू असलेल्या घडामोडीनंतर हे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे सुरू असलेली उलथापालथ थांबून महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करू दे अशीच प्रार्थना शिवसैनिकांकडून करण्यात येत असावी असे या बॅनर मधून पाहायला मिळते. 


नाशिकमध्ये भाजपचा जल्लोष
भाजपने विधानपरिषद निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर चांगलाच जल्लोष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशकात वसंतस्मृती कार्यालयाबाहेर एकमेकांना पेढे भरवून भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी ढोलताशांच्या तालावर पदाधिकाऱ्यांनी ठेका धरल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले. एवढंच नाही तर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे आणि शहराध्यक्ष यांनी फुगडी खेळत हा आनंदोत्सव साजरा केला आहे.