मुंबई: शिवसेना ही मर्दांची सेना आहे. ज्या-ज्या वेळी आपल्याला कोणी आव्हान दिलं त्यावेळी आपण त्यांना संपवून पुढं गेलोय. गद्दारांना शिवसेनेत स्थान नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही निवडून आणलेल्यांना फोडू शकाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडून दाखवा असं थेट आव्हान त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपला आव्हान दिलं. वर्षावर आता माझा शिवसैनिक जाईल असंही ते म्हणाले.  


जो शिवसैनिक माझ्यासोबत राहिल त्याच्या सोबतीने मी पुन्हा शिवसेना उभी करेन असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, "शेराला सव्वाशेर मिळतोच. शिवसेना ही तळपणारी तलवार आहे, ती म्यानात घातली तर गंजते, आणि बाहेर काढलं तर तळपते. तीच आता वेळ आली आहे. शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण केलं. आपल्याच लोकांनी पाठित खंजीर खुपसलं आहे."


उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला काहीजणांच्या वर्तणुकीविषयी शंका आल्यानंतर मी एकनाथ शिंदेनां बोलवलं आणि त्याबद्दल विचारलं. तेव्हा ते पहिला म्हणाले की राष्ट्रवादीवाले आपल्याला त्रास दिला. नंतर म्हणाले की आपण भाजपसोबत जाऊया असा आमदारांचा दबाव आहे. भाजपकडून आपल्याला तसा प्रस्ताव येऊदे असं मी सांगितलं. मातोश्रीची बदनामी, कुटुंबियांची बदनामी करणाऱ्यांच्या सोबत आपण का जायचं? विश्वासघात करणाऱ्या भाजपसोबत आपण का जायचं असं त्यांना विचारलं. त्यावेळी मी त्यांना आमदारांना घेऊन यायला सांगितलं. आमदार माझ्यासमोर आले असते आणि हे सांगितलं असतं तर ही वेळ आलीच नव्हती."


तुमची आमदारकी रद्द होईल
उद्धव ठाकरेंनी बंड केलेल्या आमदारांना इशारा देताना सांगितलं की, "माझ्या तब्येतीचं, आजारपणाचं कारण शोधून तुम्ही जर बंड करणार असाल ते अयोग्य आहे. या बंडाच्या मागे मी आहे असा संदेश पोहोचवला जातोय. मी शिवसेनेमध्ये गद्दारी करणार नाही. आज जर वेगळा तुम्ही गट स्थापन केला, आणि नंतर तो फुटला तर तुमची आमदारकी रद्द होणार. त्यामुळे शिवसेनाही संपेल आणि तुम्हीही संपाल. आज जे निवडून आले आहेत त्यांना पुन्हा निवडून येणं शक्य नाही."


उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्ती निवडून येतील अशा ठिकाणी आताच्या आमदारांना शिवसैनिकांनी निवडून दिलं. त्या ठिकाणी तुमचा हक्क असतानाही तुम्ही माझा आदेश पाळला आणि त्यांना निवडून दिलं. ज्यांना निवडून दिलं ते आपल्याला सोडून गेले. आजही तुम्हाला सांगतोय की पक्ष चालवायला मी जर योग्य नसेल तर मला तसं सांगा, मी हे पद सोडतो. शिवसेना हा विचार आहे, तो विचार भाजप आता संपवायला निघाला आहे. त्यांना हिंदुत्वाच्या विचारामध्ये भागिदार नको आहे.