मुंबई: शिवसेनेविरोधात बंड करुन सुरतमध्ये गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर सेनेने कारवाई करत त्यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. त्या ठिकाणी आता शिवडी मतदारसंघाच्या अजय चौधरी यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर तडकाफडकी कारवाई करत हा निर्णय घेतला आहे. 


कोण आहेत अजय चौधरी? 
अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी 40 हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता. चौधरी हे परळ येथे वास्तव्यास आहेत. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच मांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.


ट्वीट करुन एकनाथ शिंदेंची भूमिका स्पष्ट
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही."


दरम्यान, काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर अचानक एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांसह सुरतमध्ये गेले आहेत. त्यांच्यासोबत एकूण 35 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय जाणकारांच्या मते, एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर नाराज नाही तर महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये असण्याच्या विरोधात आहेत. 


एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोणते आमदार ? 
मुंबई


1. मागााठाणे आमदार प्रकाश सुर्वे


मराठवाडा 


1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
6. नांदेडचे बालाजी कल्याणकर


कोकण 
1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले


पश्चिम महाराष्ट्र 
1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर
2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे


ठाणे  
1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर


उत्तर महाराष्ट्र  
1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील


विदर्भ 
1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड