Rahul Narvekar On Disqualification : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा बंड झालं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राजीनामा देऊन थेट सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यासारखे शरद पवारांच्या जवळचे नेतेही शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस थेट सत्तेत सहभागी झाल्याने, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 'त्या' आमदारांबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर काही आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांवर ही कारवाई विधानसभा अध्यक्ष करणार का असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना (Rahul Narvekar) विचारण्यात आला.  


राहुल नार्वेकर म्हणाले, "त्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे ज्यावेळी निर्णय होईल, त्यावेळी तुम्हाला कळवण्यात येईल. अजित पवारांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. तो स्वीकारला आहे" 



16 आमदारांचं काय होणार? 


सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निर्णय मे महिन्यात दिला होता. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. त्यावेळी कोर्टाने एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांची गटनेते आणि प्रतोद पदी करण्यात आलेली निवड चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार आहेत.


त्यामुळे विरोधी पक्षाकडून सातत्याने राहुल नार्वेकर यांना लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत होतं. तर जितेंद्र आव्हाड यांनी कोर्टाचा निर्णय समजून घेऊया असं अभियानच हाती घेतला आहे


सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्ण होऊन आता दीड एक महिना उलटत आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच आता आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलवण्यात येणार आहे आणि आमदारांचे म्हणणं ऐकल्यानंतरच राहुल नार्वेकर आपला निर्णय देणार आहेत. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणेच विधिमंडळाचा देखील निर्णय वेळीत लागेल हीच अपेक्षा. 


अजित पवारांसह 9 जणांचा शपथविधी


विधानसभेचे सदस्य  अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये  छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे,  धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  


यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.