No confidence motion against Assembly Speaker Rahul Narvekar  : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात (Nagpur Hiwali Adhiveshan) राजकारण चांगलंच तापलं आहे. आता महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात मविआकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र सोपवलं आहे. काँग्रेसचे सुनील केदार,शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर,अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलं आहे. पण या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नाही.  विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहित नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

  


सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळं विरोधी पक्षांकडून नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे. विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे हे पत्र दिलं आहे. ज्यावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या सह्या आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांना सभागृहात बोलून दिलं जात नसल्यानं मविआनं हे पाऊल उचललं असल्याचं समजत आहे. 


याच नाराजीतून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस विधिमंडळ सचिवांना देण्यात आलेली आहे. आता या प्रस्तावाबाबत पुढचा निर्णय काय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असं असलं तरी भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत असल्यानं प्रस्ताव आणला तरी तो मंजूर होण्याची शक्यता मात्र कमीच आहे. 


नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरुवातीपासूनच वादळी ठरत असल्याचं दिसून येत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य, अब्दुल सत्तारांवरील आरोप, आदित्य ठाकरेंचा मुद्दा अशा विविध विषयांनी अधिवेशन गाजलं आहे. अशात विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नसल्यानं पहिल्या दिवशीपासून नाराजी आहे. 


प्रस्तावावर अजित पवार यांची सही नाही?

अविश्वास प्रस्ताव विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या पत्रावर महाविकास आघाडीच्या 39 जणांच्या सह्या आहेत.  पण या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नाही.  विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहित नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.  विधानसभाध्यक्ष पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप मविआच्या नेत्यांनी केला आहे..


विरोधक वैफल्यग्रस्त, भाजपचा आरोप


भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे की, विरोधकांनी जरी अविश्वास ठरावाचं पत्र दिलं असलं तरीही विधानसभेचे बहुमत आमच्यासोबत आहे. विरोधकांच्या मनातलं बोलू दिले जात नाही म्हणून ते असे आरोप करतात. विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत त्याच्यामुळे अविश्वास ठराव आणला जातोय. आज अजित पवार बोलले, देवेंद्र फडणवीस बोलले, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. विधानसभा अध्यक्षांवर पक्षपाताचा आरोप होतो हे योग्य नाही, असं भातखळकर म्हणाले.


राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी देखील विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या संतापात विधानसभा अध्यक्षांना (Maharashtra Assembly Winter Session) असंसदीय शब्द वापरल्यानंतर मोठा गदारोळ झाला. शेवटी त्यांना या अधिवेशनापुरतं निलंबित करण्यात आलं.  सत्ताधारी बाकांवरील सदस्यांना बोलण्याची संधी जास्त मिळते यावरुन विरोधकांनी याआधीही सभागृहात नाराजी बोलून दाखवली होती. जयंत पाटलांच्या निलंबनावेळी देखील आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली होती जी, मागणी अध्यक्षांनी फेटाळली होती. जयंत पाटील यांनी यावरुन संताप व्यक्त करत तुम्ही असा ***** करु नका, असे म्हटले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले होते, यानंतर गदारोळ होऊन जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतर त्यांना या अधिवेशनापुरतं निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 


या सर्व घडामोडींमुळं विधानसभा अध्यक्षांविरोधात मविआचा नाराजीचा सूर होता. जो आता अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून अधिक आक्रमकपणे समोर आला आहे. आता या अविश्वास प्रस्तावावर नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.