Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलामध्ये 17,471 पदांसाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेत मोठी अपडेट समोर आली आहे. भरती प्रक्रियेत उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे. त्यामुळे एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्यावे, अशी सूचना गृह खात्याकडून करण्यात आली आहे. एका जिल्ह्याची निवड करून हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालयात द्यावे, अशी सूचना प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत 17 मे पर्यंत आहे. त्यानंतर येणारे अर्ज बाद होणार आहेत.


राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरल्याचे लक्षात आल्यानंतर गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे कोणत्याही एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.


तब्बल 17 लाख 76 हजार अर्ज दाखल


दरम्यान, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 17 हजार 471 पदांसाठी भरती होत आहे. मात्र या पदांसाठी राज्यात तब्बल 17 लाख 76 हजार तरुण तरुणांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये इंजिनिअर, डॉक्टर, बी टेक आणि एमबीए पदवी घेणारे सुद्धा असल्याने महाराष्ट्रातील भीषण बेरोजगारीचे वास्तव समोर आलं आहे. 


उच्च शिक्षित उमेदवारांची तब्बल 41 टक्क्यांपेक्षा जास्त संख्या असल्याने एकंदरीतच महाराष्ट्रातील बेरोजगारीने किती कळस गाठला आहे, याचीच प्रचिती आली आहे. पदवी आणि पदवीधर शिक्षण घेतलेल्यांचे 41 टक्के पेक्षा जास्त संख्या आहे. यामध्ये उच्च शिक्षितांचा सुद्धा समावेश आहे. राज्यात 5 मार्चपासून पोलिस प्रक्रियेत भरतीला प्रारंभ झाला आहे. 15 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. मे महिन्याच्या अखेरपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होईल. त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबर अखेर निवड झालेल्यांचे प्रशिक्षण होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या