Parbhani News : परभणीत भगरीमुळे जवळपास 800 गावकऱ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आलीय. अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत तब्बल साडे 6 किलो क्विंंटल भगर जप्त केली आहे. विषबाधेच्या प्रकारानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
परभणीत सव्वा पाच लाख किंमतीची भगर जप्त
परभणी जिल्ह्यातील सोन्ना, पालम, गंगाखेड या ठिकाणी झालेल्या भगरीतून विषबाधेच्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली, यावेळी जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून सव्वा पाच लाख किंमतीची 6 क्विंटल 293 किलो भगर जप्त करण्यात आली आहे.
800 गावकऱ्यांना विषबाधा झाली होती
परभणीच्या सोन्ना गावात सुरू असलेल्या सप्ताह समाप्तीच्या कार्यक्रमात भगरीतून जवळपास 800 गावकऱ्यांना विषबाधा झाली होती. सोन्ना पाठोपाठ पालम आणि गंगाखेड मध्येही असाच प्रकार घडला होता. या सर्व घटनांनंतर अन्न व औषध विभागाने कारवाई सुरू करत भगर जप्त केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या वेगवेगळ्या पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी कारवाई करत 6 क्विंटल 293 किलो भगर जप्त केलीय. ज्याची किंमत 5 लाख 20 हजार 195 रुपये एवढी आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या महाप्रसादातून झाली विषबाधा
परभणी तालुक्यातील सोन्ना येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाप्रसादाचे सेवन केलेल्या जवळपास 800 ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी समोर आला होता. एकादशी असल्याने ग्रामस्थांसाठी आयोजकांनी मंगळवारी सायंकाळी भगरीचा प्रसाद तयार केला होता. हा महाप्रसाद ग्रामस्थांनी सेवन केल्यानंतर लहान बालकांसह वयोवृद्ध ग्रामस्थांना उलटी तसेच मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी मध्यरात्री उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांकडे धाव घेतली. त्यानंतर रुग्णांवर योग्य तो उपचार करून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले. ज्यानंतर सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या संपूर्ण प्रकाराची माहिती ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिली होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन
नागरिकांनी सुटी भगर किंवा भगर पीठ खाऊ नये, असे आवाहन अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा>>