Abhishek Ghosalkar Firing Live Update : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल, दोघं पोलिसांच्या ताब्यात, तपास गुन्हे शाखेकडे

Abhishek Ghosalkar Death Live Update : शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार करण्यात आला होता.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Feb 2024 07:42 PM
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर प्रकरणात अमरिंदर मिश्रावर गुन्हा दाखल 

Abhishek Ghosalkar :  अभिषेक घोसाळकर यांच्या प्रकरणात अमरिंदर मिश्रावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या शस्त्राने अभिषेक यांच्यावर गोळी झाडण्यात आली ते शस्र त्यांचं होतं. त्यामुळे शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाला त्यांच्या धाकट्या भावाने अग्नी दिला

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाला त्यांचा धाकटा भावाने अग्नी दिला आहे.  ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने नोरोन्हा याने गुरुवारी (दि.9) गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर मॉरिसने स्वत:वरही फेसबुक लाईव्ह करत गोळ्या झाडून घेतल्या. त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला होता. 

Abhishek Ghosalkar Firing Case : "सत्ताधारीच गुन्हेगार झालेत, न्याय कोणाला मागायचा?" बाळासाहेब थोरातांची संतप्त प्रतिक्रिया

Balasaheb Thorat On Abhishek Ghosalkar Firing Case :  काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. राज्य सरकारचा गुन्हेगारांवरचा धाक संपल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहे. त्यामुळे न्याय कोणाला मागायचा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतील गोळीबार आणि राहुरी येथील वकील दाम्पत्य हत्येवरून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. भाजपचा (BJP) आमदार गोळीबार करतो आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो, याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे, असा समाचार बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे. 

Abhishek Ghosalkar Firing Case : मॉरिसने आत्महत्या केली नाही, त्याचीही हत्याच, ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Nitin Deshmukh On Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर हत्या करणाऱ्या मॉरीसचीही कुणीतरी हत्या केली असावी असं मला वाटतं. यात कुणीतरी तिसऱ्या माणसाचाही हात असावा अशी दाट शंका आहे.

Abhishek Ghosalkar Firing Case : मॉरिसने आत्महत्या केली नाही, त्याचीही हत्याच, ठाकरे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

Nitin Deshmukh On Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर हत्या करणाऱ्या मॉरीसचीही कुणीतरी हत्या केली असावी असं मला वाटतं. यात कुणीतरी तिसऱ्या माणसाचाही हात असावा अशी दाट शंका आहे.

Abhishek Ghosalkar Firing Case : 'घोसाळकरांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता, चौकशी पूर्वी मी नाव घेणे योग्य नाही' - विजय वडेट्टीवारांचा मोठा आरोप

Vijay Wadettiwar On Abhishek Ghosalkar Firing Case : राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून नावाला ही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, हा वसुलीबाज सरकारचा परिणाम आहे.. गुंडांचा मुक्त संचार राज्यात होत आहे.. घोसाळकर यांचे प्रकरण सत्ताधारी लोकांमुळे झाले आहे.. सर्व पूर्व नियोजित आहे.. यामागे मोठा कट आहे.. या मागे सत्ताधारी पक्षाचा समोर समोर करणारा प्रवक्ता आहे का हे भविष्यात समोर येईल.. एकूणच राज्य बिहार आणि उत्तर प्रदेश पेक्षाही वाईट अवस्थेत जात आहे.. राज्य वाऱ्यावर सोडून सत्ता आणि संपत्ती साठी खुर्ची वापरत आहे.. घोसाळकर यांच्या हत्ये मागे सत्ताधारी पक्षाचा एक महिला किंवा पुरुष प्रवक्ता आहे.. चौकशीत समोर येईल. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे.. या मागे सत्ताधारी पक्षाचा एक नेता आहे.. चौकशी पूर्वी मी त्याचा नाव घेणे योग्य नाही. असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.


 

Abhishek Ghosalkar Firing Case : घोसाळकरांवर गोळीबार करणाऱ्या आरोपी मॉरिसच्या मृतदेहाला चर्चमध्ये दफन करण्यास स्थानिकांचा विरोध

Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून स्वतः आत्महत्या केलेल्या मॉरिस यांच्या मृतदेहाला चर्चमध्ये दफन करण्यास स्थानिकांनी विरोध केल्याची माहिती समोर येतेय.


त्यामुळे मृतदेह दफन करायचा की नाही हा अंतिम निर्णय चर्चच्या फादरचा असेल..


यावर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कँसेप्शन चर्चचे फादर जेरी यांनी मृतदेह दफन करण्यास नाकारलं, तर मॉरिसचा मृतदेह सार्वजनिक असलेल्या चर्चमध्ये दफन करण्यात येईल.


जवळच सार्वजनिक चर्च गोराईमध्ये आहे.


त्यामुळे आता फादरच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून ते परवानगी देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मनसुखला कुणी मारलं? अंबानीच्या घराबाहेर स्फोटके कुणी ठेवली, वसुली कोण करत होते ? मुंबई भाजपा ट्विटर अकाउंटवरून संजय राऊताना सवाल

दोन्हीही लोक तुमच्या पक्षाचे होते. हे उबाठा गटातील परस्पर वैमनस्य आहे. मॉरिस नेहमी उद्धव ठाकरेंचे बॅनर लावायचा अश्या शब्दांत
मुंबई भाजपा ट्विटर अकाउंटवरून संजय राऊत यांनी अभिषेक घोसाळकर गोळीबारप्रकरणी केलेल्या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. महाविकास आघाडी सरकार असताना मनसुखला कुणी मारलं? अंबानीच्या घराबाहेर स्फोटके कुणी ठेवली, वसुली कोण करत होते ? असाही सवाल ट्विटमधून संजय राऊत यांना मुंबई भाजपने केला आहे.

Abhishek Ghosalkar : सत्ताधारी लोकं महाराष्ट्राचा बिहार करत आहे, पोलिसांची भीती राहली नाही, यशोमती ठाकूर यांची टीका 

Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. सत्ताधारी लोकं महाराष्ट्राचा बिहार करत आहे. पोलिसांची भीती राहली नाही आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे दिले पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्राला डाग लावणाऱ्या सत्ताधाऱ्याला जनता सोडणार नाही. सगळे गोळीबार करणारे म्हणतात आमचे बॉस सागर आणि वर्षा बंगल्यावर राहतात. नागपूर मध्ये क्राईम रेट वाढला तर पुण्यात कोयता गॅंग वाढली आहे.


 

Abhishek Ghosalkar Firing Case : घोसाळकरांच्या परिसरात दुकाने आज बंद 

Abhishek Ghosalkar Firing Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण


 घोसाळकर ज्या परिसरात राहतात, त्या दौलत नगर परिसरातील दुकाने आज बंद 


स्थानिकांनी स्वेच्छेने केली दुकाने बंद 


दौलत नगर तसेच दहिसर परिसरातील दुकाने बंद 


मेडिकल व्यतिरिक्त इतर सगळी दुकाने बंद

Abhishek Ghosalkar Firing Case :  जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल -  चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil On Abhishek Ghosalkar Firing Case : विरोधकांनी टीका करणे हे त्यांचं कामच आहे. परंतु घडणाऱ्या घटना या चिंताजनक आहेत. प्रत्येक घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जात असून यात जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिकिया दिलीय.


 दिवसभरामध्ये 5 हजार पेक्षा अधिक लोक भेटतात - चंद्रकांत पाटील


एकनाथ शिंदे हे इतके लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत की, त्यांना दिवसभरामध्ये 5 हजार पेक्षा अधिक लोक भेटतात. त्यांचे हे वैशिष्ट्य आहे की ते प्रत्येक माणसाची दखल घेतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर फोटो काढला असेल तर त्यांचा काही त्याच्याशी संबंध आहे असं म्हणणं योग्य नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Abhishek Ghosalkar Firing Case : गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, घोसाळकर गोळीबारप्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)  यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या (Abhishek Ghosalkar Firing Case) करण्यात आली.  यावरुन विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. 


घोसाळकर गोळीबारप्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया


अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. एका तरुण नेत्याचे असे निधन होणे गंभीर आहे.  ज्यांनी गोळ्या घातल्या ते मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर एकत्र होते. पण त्यांचा नेमका काय वाद झाला आणि असे कृत्य का घडलं? याची पोलीस चौकशी करत आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Abhishek Ghosalkar Firing Case : 'सामाना'तून मॉरिसभाईचं प्रमोशन, मात्र मातोश्रीचा घोसाळकरांना आशीर्वाद, उदय सामंतांचा गंभीर आरोप

Uday Samant On Abhishek Ghosalkar Firing Case  : शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले.. अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम केले जात आहे. मात्र, उबाठा गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली आहे. या दोघांमध्ये मी नगरसेवक होणार की तू नगरसेवक होणार, हा वाद होता. यामधून हा प्रकार घडल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी केले. 


आजपर्यंत 'सामना' या दैनिकातून मॉरिस नोरान्हो याचे उदात्तीकरण करण्यात आले. 'सामना'तून वेळोवेळी मॉरिस नोरान्होच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता. मॉरिसच्या कामाला 'सामना'तून तर घोसाळकर कुटुंबीयांच्या कामाला मातोश्रीवरुन पाठिंबा दिला जात होता. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणे चूक आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले.

Abhishek Ghosalkar Firing Case : "गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी?" सुप्रिया सुळेंची घोसाळकर हत्येबाबत प्रतिक्रिया

Supriya Sule On Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीय, त्या म्हणाल्या.. मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची सोशल मिडियावर लाईव्ह असताना गोळीबार करुन हत्या करण्यात आली. नेत्यांवर गोळीबार होण्याची ही महिन्यातील दुसरी वेळ. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजरोसपणे गुंडांना भेटत असून त्यांना राजाश्रय मिळत असल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या राज्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड म्हणाले त्याप्रमाणे अधिकृतपणे 'गुंडाराज' सुरु झाले आहे का? नेत्यांचे दिवसाढवळ्या खुन पडत आहेत. याचाच अर्थ राज्याच्या गृहमंत्री महोदयांचे त्यांच्या स्वतःच्या खात्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांच्या या दुर्लक्षामुळे कायदा सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी? 

Abhishek Ghosalkar Firing Case :  'लोकांच्या डोक्याला झालंय काय, फेसबुक लाईव्ह करतात अन् अशा घडतात' : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal On Abhishek Ghosalkar : मुंबईतील दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  भुजबळ म्हणाले की, लोकांच्या डोक्याला झालंय काय? मला कळत नाही, फेसबुक लाईव्ह करतात आणि अशा घटना घडतात. यात पोलीस (Police) तरी काय करणार, चोऱ्या दंगल अशा घटनांमध्ये पोलीस संरक्षण देत असतात, इथं तुमच्या घरात येऊन घटना घडतात. पोलिसांनी बंदूक लायसन्स देताना अधिक काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.  

Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक घोसाळकरची हत्या करताना मॉरिसने वापरली अंगरक्षकाची बंदूक

Abhishek Ghosalkar Firing Caseअभिषेक घोसाळकरची हत्या करताना मॉरिसने वापरली अंगरक्षकाची बंदूक. मॉरिसचा मिश्रा नावाचा अंगरक्षक आहे. या मिश्राकडे असलेली परदेशी बनावटीची बंदूक मॉरीशने वापरली. ही बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे, अधिक तपास पोलीस करत आहेत, पोलीस सूत्रांची माहिती

Abhishek Ghosalkar Firing Case : राज्याचं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Abhishek Ghosalkar Firing Case : महाराष्ट्रात माफिया राज पाहायला मिळत आहे. हे अपयश घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचं आहे. राज्यात हत्या, दरोडा सारख्या घटना घडत आहे. राज्याचं सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)  यांच्या हत्येच्या घटनेवरून संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल, तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल


भा द वि 302 आणि हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल 


तथाकथित सामाजिक कार्यकर्ता मॉरिस नोऱ्होना विरोधात गुन्हा दाखल


हत्या करताच मॉरिसने स्वतःला गोळी मारत स्वतःला संपवलं 


घटनास्थळावरून पिस्तूल जप्त


परदेशी बनावटीची पिस्तूल जप्त


मॉरिसकडे पिस्तुलाचा परवाना देखील नव्हता 


MHB पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद 


गुन्हा दाखल करताच तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी आरोपीबाबत प्रत्यक्षदर्शीने दिली माहिती, म्हणाले...

Abhishek Ghosalkar : हळदीकुंकू आणि साडी वाटप करु असे मॉरिसने घोसाळकर याला सांगून बोलवलं होतं, प्रत्यक्षदर्शी लालचंद पाल यांनी एबीपी माझाला माहिती दिली. ते म्गणाले, आरोपी मॉरिस यांनी सकाळी 11 वाजता कॉल करून अभिषेक घोसाळकर यांना बोलवलं होतं. संध्याकाळी आपल्याला हळदीकुंकू आणि साडी वाटप कार्यक्रम करायचा आहे. हा कार्यक्रम आपल्याला एकत्र करायचा आहे, त्यामध्ये तुम्ही या, असे सांगितलं होतं. त्यासाठी अभिषेक घोसाळकर यांनी सहा वाजता मॉरिश याच्या कार्यालयात गेले.


कार्यकर्त्यांना सांगितलं बाहेर बसा, आम्हाला FB Live करायचेय



मॉरिसच्या कार्यक्रमात आपल्याला जायचे त्यासाठी काही कार्यकर्त्यांना बोलून घ्या, असे अभिषेक घोसाळकर यांनी साडेअकरा वाजता लालचंद पाल याना कॉल करून सांगितलं  होतं. लालचंद पाल 15 ते 16 कार्यकर्त्यांघेऊन अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत आरोपीचा कार्यालयात गेले.कार्यालयात गेल्यानंतर आरोपीने सांगितला आम्हाला फेसबुक लाईव्ह करायचं तुम्ही बाहेर बसा आम्ही दोघे फेसबुक लाईव्ह करून बाहेर येणार आहेत,असे सांगितलं.

Abhishek Ghosalkar : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? विजय वडेट्टीवारांचा घोसाळकर गोळीबार प्रकरणी सवाल

Abhishek Ghosalkar : फेसबुक लाईव्ह करून एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो, यापेक्षा राज्याचे दुसरे दुर्दैव काय असू शकते? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. 

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Abhishek Ghosalkar Firing : मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Shot in Mumbai)  यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माणूसकीला काळीमा फासणारी घटना आणि अशा घटना कोणत्याही शहरात होता कामा नये,  तपास व्यवस्थित व्हायला हवा,असं ते म्हणाले. अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहे. पुण्यातील विमानतळ टर्मिनलची पाहणी कराताना ते माध्यमांशी बोलत होते. 

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. आरोपी मॉरिस नोरोन्हाचा पीए मेहुल पारीख आणि दुसरा रोहित साहू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एम एच बी पोलिसांनी त्यांच्याकडून 1 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहे..

Abhishek Ghosalkar Firing : गोळीबार करणारा आरोपी मॉरिशच्या PA ला पोलिसांकडून अटक, गोळीबार होताना घोसाळकर याचे नाव घेत होते

Abhishek Ghosalkar Firingशिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार करणारा आरोपी मॉरिश याचा PA मेहुल पारीखला एम एच बी पोलिसांनी रात्री ताब्यात घेतलं आहे. आरोपी कडून गोळीबार होताना अभिषेक घोसाळकर या आरोपीचे नाव घेत होते. अशी माहिती मिळत आहे

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकरांचे पार्थिव घरी आणण्यात आले. दहाच्या सुमारास अंत्यदर्शन, मोठा पोलीस बंदोबस्त

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर यांचा मृतदेह सध्या आनंद नगर, जरी मरी गार्डन दहिसर ईस्ट परिसरात एका इमारतीत जुन्या घरी आणण्यात आलाय. या ठिकाणी कुटुंबीय दर्शन घेतील. त्यानंतर दहाच्या सुमारास त्यांचं पार्थिव विनोद घोसाळकर यांच्या घरी सर्वांना अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. सध्या आनंद नगर परिसरामध्ये ज्या ठिकाणी मृतदेह आणण्यात आलाय त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कुटुंबीयांशिवाय कोणालाही त्या सोसायटीत आत मध्ये सोडलं जात नाहीये.

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृहमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली - सूत्र

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृहमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली - सूत्र


नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची घेतली माहिती - सूत्र


रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती


मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा


आठवड्याभरात दुसरे गोळीबार प्रकरण समोर आल्याने विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची होतेय मागणी

Abhishek Ghosalkar Firing : राज्यात गुंडांचं सरकार बसलंय, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया


Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले. आता बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला. काय चाललय या राज्यात? गुंड्याचं सरकार बसलंय. एका आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथून लावावं लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही, ते बदनामच आहे, पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय. 

Abhishek Ghosalkar Firing : ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडून हत्या, महाराष्ट्रात वाढत चाललंय गुंडागर्दीचं राज्य? सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न

Abhishek Ghosalkar Firing : महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडावा इतक्या भयंकर घटना सध्या या राज्यात घडतायत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची आधी पुण्यात त्याच्याच साथीदारांनी दिवसाढवळ्या, भर रस्त्यात हत्या केली. मग कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, मुंबईतल्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची गुरूवारी हत्या करण्यात आली. 

Abhishek Ghosalkar Firing : ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा कोण आहे?


Abhishek Ghosalkar Firing :  ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर (Abhishek Ghosalkar) झालेल्या गोळीबारात (Dahisar Firing Incident) त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी मारुन संपवलं. अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता. 

Abhishek Ghosalkar Firing : पैश्याच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती समोर, अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार

Abhishek Ghosalkar Firing : बोरिवलीतील पश्चिममधील प्रभू उद्योग भवन कार्यालयात अभिषेक यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पैश्याचा वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येतेय. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकरांचे पुत्र आहेत. मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तिकडून अभिषेक घोसाळकरांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकरांच्या शरिरात घुसल्या होत्या.

Abhishek Ghosalkar Firing : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू

Abhishek Ghosalkar Firing : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर (Abhishek Ghosalkar) झालेल्या गोळीबारात (Dahisar Firing Incident) त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. 

पार्श्वभूमी

Abhishek Ghosalkar Death Live Update : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर (Abhishek Ghosalkar) झालेल्या गोळीबारात (Dahisar Firing Incident) त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी मारुन संपवलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.