Maharashtra Palghar News : ओबीसी (OBC) हक्क समितीच्या वतीनं पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी 29 एप्रिल रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यात ओबीसी समाज असूनही तो शून्य टक्के असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व पक्षीय ओबीसी समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे. सदर मोर्चाची तयारी ही एक महिन्यांपासून सुरु आहे. या मोर्चात पालघर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांची ताकद एकजूट करत अतिशय शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.


जिल्ह्यातील ओबीसींनी संघटीत होऊन हा अन्याय हाणून पाडण्यासाठी आणि ओबीसींच्या न्याय हक्कासाठी शुक्रवारी 29 एप्रिल रोजी पालघर जिल्हा ओबीसी हक्क समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं आहे. सदर मोर्चा दुपारी 3 वाजता सिडको मैदान येथून सुरु होऊन 4:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचेल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना शासनास द्यावयाचं निवेदन सुपूर्त करण्यात येईल. सदर मोर्चाकरीता पालघर जिल्ह्यातील सामाजिक संघटना आमदार, खासदार तसेच इतर संबंधित पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.




तसेच, मोर्चाकरीता पालघर जिल्ह्यातील वसई, विरार, डहाणू, बोईसर, पालघर, वाडा विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा विविध तालुक्यामधील 70 ते 75 हजारांच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्यामुळे उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांच्याकडून वाहतूक नियंत्रणासाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या आहे. यानुसार 29 एप्रिल रोजी 11 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीकरीता बंद करण्यात येणाऱ्या मार्गावरील पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे... 


1. पालघर शहरातून खारेकुरण, मोरेकुरण आणि दांडेकर कॉलेजकडे जाणाऱ्या वाहनांसाठी टेंभाडे - चाफेकर कॉलेज - खारेकुरण कल्याण नाका - हरिजन पाडा - मोरेकुरण मार्गे जातील.
2. बोईसर बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी वाहने कोळगाव रेल्वे फाटक - पोलीस परेड मैदान जेनिसीस इंडस्ट्रीयल एरिया - नंडोरे नाका येथून पालघर - मनोर मुख्य रस्ता मार्गे जातील.
3. मनोर बाजूकडून बोईसरकडे जाणारी वाहने नंडोरे नाका जेनिसिस इंडस्ट्रीयल एरिया पोलीस परेड मैदान कोळगाव रेल्वे फाटकातून पालघर बोईसर मुख्य रस्ता मार्गे जातील.
4. पालघर बाजूकडून बोईसरकडे जाणारी वाहने नंडोरे नाका जेनिसिस इंडस्ट्रीयल एरिया पोलीस परेड मैदान कोळगाव रेल्वे फाटकातून बोईसर मुख्य रस्ता मार्गे जातील. उपरोक्त मार्गावर शुक्रवार 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात आला आहे.