पालघर : पालघर जिल्ह्यात (ग्रामीण) मागील आठवडाभरात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 38 ने वाढून 4 हजार 918 वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्यमुळे जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमधील ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड्स देखील संपल्यात जमा असून केवळ बोईसरमधील चिन्मया हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे 15, आयसीयुचे 2 व व्हेंटिलेटर्स ची सुविधा असलेले 2 बेड्स उपलब्ध आहेत.


जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी पालघर ग्रामीणमध्ये 723 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात पालघर तालुक्यातील 355, जव्हारमधील 184, डहाणूतील 72, मोखाड्यातील 35, तलासरीतील 28, विक्रमगडमधील 26, वसई ग्रामीणमधील 22 व वाडा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना रुग्णवाढीचा दैनंदिन आकडा रोज नवीन उच्चांक गाठत असल्याने गेल्या रविवारपासून या रविवारपर्यंतची आकडेवारी पाहिल्यास केवळ आठवडाभरात 2 हजार 38 नवे रुग्ण वाढले आहेत. गेल्या रविवारी जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 883 इतकी होती. आता ती 4 हजार 918 वर पोहोचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या आठवडाभरात 37 रुग्णांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे


 पालकमंत्री दादाजी भुसे यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष!
एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचं भयाण वास्तव असताना जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे जिल्ह्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्याची ओरड नागरिकांबरोबर विरोधी पक्षांकडून होत असताना आत्ता सरकारमध्ये असलेले लोकप्रतिनिधीही तक्रार करू लागलेत. तर शिवसैनिक ही ह्या गोष्टीमुळे पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्षरीत्या नाराजी दर्शवित आहेत. काही शिवसैनिकांनी ही बाब पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनाही अनेक वेळा बोलून दाखवली आहे. तर पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री बदलावा अशीही मागणी विरोधकांबरोबर स्वकीय ही करत आहेत. कोरोना काळात पालकमंत्र्यांनी फक्त एक ते दोन वेळाच पालघरला भेट दिल्याची माहिती सांगण्यात येते. तर ते फक्त व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्‍ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत असतात.


तर दुसरीकडे सातत्याने ऑक्सिजनची कमतरता भासत असून रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा आहे.तर जास्त बेडची क्षमता असलेल्या कोरोना सेंटर मध्ये मनुष्यबळाचाही मोठ्या प्रमाणात उणिव भासत आहे. विक्रमगडच्या रिव्हेरा कोरोना सेंटर मध्ये 250 बेड क्षमता असताना फक्त सहा डॉक्टर्स, काही नर्सेस आणि मोजके वोर्डबॉय कार्यरत आहेत. या सर्वांना दिवस रात्र झटूनही सर्व रुग्णांना वेळेत पूर्ण सेवा पोहोचविणे कठिण जात आहे.


त्यामुळे जिल्ह्यात काही रुग्णांना फक्त ऑक्सिजन बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. पालघर ग्रामीणचा मृत्युदरही सध्या या असुविधा असल्याने झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात 25 ते 50 वयोगटातील काही रुग्णांचे जीव गेले आहेत.


सध्या काही नवीन खाजगी कोरोना सेंटर्स उभी राहिली आहेत. मात्र जोपर्यंत ऑक्सिजन सिलेंडर योग्य प्रमाणात व अखंडित पुरवठा होणार असेल तरच ही सेंटर सुरू करण्याची तसदी मालक घेणार असल्याचे माहिती पुढे येत आहे. कारण सामग्री अभावी रुग्णांना असुविधा झाली तर ती सर्व हॉस्पिटलच्या माथी मारली जाते, ही भीती  हॉस्पिटल मालकांच्या मनात आहे. त्यामुळे शासनाने प्रथम या सर्व गोष्टींची व्यवस्था करावी ही मागणीही करण्यात येत आहे.


कोरोना काळात पालघर जिल्हा कठिण परिस्थितीचा सामना करत आहे  त्यामुळे  हा जिल्हा पोरका झाला असून जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे अज्ञातवासात गेलेत याचा शोध घेणे आवश्यक आहे या कठीण परिस्थितीत पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरवून पाहत नसतील तर ते कोणत्याही उपयोगाचे नाहीत त्यामुळे आमच्या जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी कोणालाही मंत्रिपद देऊन पालकमंत्री करावं किंवा सक्षम पालक मंत्री जिल्ह्याला द्यावा अशी मागणी आम्ही करत आहोत, असं पालघर भाजप उपजिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितलं आहे.