Ulhas Bapat On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर राज्याचे गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. अशातच औरंगाबादचे पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पोलीस पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणावरून त्यांच्यावर कारवाई होणार का? आणि कारवाई झाल्यास काय होऊ शकते? यासंदर्भात घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी एबीपी माझा सोबत बातचीत केलीय.
तर निश्चित कारवाई होऊ शकते - उल्हास बापट
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील कालच्या भाषणावरून जी कलमं लावली जातील, ती कोर्टात टिकणार नाही कारण कित्येक वेळा कलमे आधी ठरवली जातात आणि मग तशा घटना घडतात का त्या अनुषंगाने गुन्हे दाखल केले जातात, अभिव्यक्ती, भाषण स्वातंत्र्य असलं तरी कायदा हातात घेता येत नाही, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य असतील तर निश्चित कारवाई होऊ शकते, असं कायदातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी बातचीत केली.
जेवढे लोकं सभेला येतात, तेवढं त्यांचं राजकीय वजन वाढतं
राज ठाकरे यांच्या भाषणावरून कलम लावले जाईल, पण ते कोर्टात टिकणार नाही. राज ठाकरे फक्त गर्दी जमा करतात, ती गर्दी जमा करणं कोणत्या राजकीय पक्षाला न परवडणार आहे. कित्येक वेळा कलम आधी ठरवलं जातं आणि मग गुन्हे दाखल केला जातो. राज ठाकरे यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं, कारण जेवढे लोकं सभेला येतात, तेवढं त्यांचं राजकीय वजन वाढतं असं उल्हास बापट म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, 4 तारखेपासून ऐकणार नाही...
''रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पडता, कोणी अधिकार दिले तुम्हाला'', असं राज ठाकरे म्हणाले आहेत. ते म्हणाले, माझी शासनाला विनंती आहे, आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला मध्ये यायचं नाही, मात्र 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 4 तारखेनंतर जिथे जिथे लाउडस्पीकरवरून अजाण होणार, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कालच्या औरंगाबादच्या सभेत मनसैनिकांना दिले आहेत.
मनसेच्या सभेनंतर गृहखातं अॅक्शन मोड मध्ये
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादमधील भाषण प्रक्षोभक असून त्यांच्या या भूमिकेचे सर्वधर्मियांवर परिणाम होतील. राज ठाकरे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल यावेळी गृहमंत्र्यांनी केलाय. ते म्हणाले, राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर संवेदनशील भागांसाठी विशेष सूचना गृह मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करणार असल्याचे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. राज्यातील कायदा संदर्भात चर्चा तसंच ईद सण असल्याने राज्यातील एकूण परिस्थितीची आढावा घेतला जाणार आहे. अशी माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली