बीड : बीड जिल्हा बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या कारणास्तव भिडल्याचंही म्हटलं गेलं. वेळ संपल्यानंतरही मतदान केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. परळीमध्ये बोगस मतदान झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळं सध्या ही निवडणूक वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे.
सुधाकर प्रभाकर फड यांनी मतदान न करताही मतदान झालंच कसं हाच प्रश्न उपस्थित करत थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडेच यासंदर्भातील तक्रार करण्यात आली. यावेळी दोषींवर कारवाई करण्याचाही सुर आळवण्यात आला. इथं लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे परळी हा राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ आहे.
दरम्यान, अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या बँकेच्या निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. मतदान शांततेत पार पडत असल्याचं चित्र दिसून येतानाच काहीसं अनपेक्षित वृत्त समोर आलं. ज्यामध्ये कुठं वेळ संपल्यानंतर मतदान करण्यात आल्याचं म्हटलं गेलं, तर वैद्यनाथ सहकारी औद्योगिक संस्था केंद्रावर बोगस मतदान झाल्याची माहिती समोर आली. भाजपकडून या निवडणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.