महाड: दिवाळीनिमित्त यंदा लागून आलेल्या  या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी  पर्यटकांनी प्रामुख्याने कोकणाला पसंती दर्शविली आहे.  कोकणातील सह्याद्रीच्य  नागमोडी रस्त्यावरू जाताना पर्यटकांना रस्ते माहित नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  अलीकडे गुगल मॅपच्या साह्याने कोकणात इच्छित स्थळी जात असताना अनेकांची वाट चुकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.  


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशा विदेशातून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पर्यटक कोकणात येत असतात. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना कोकणातील सह्याद्रीच्या कडेकपारीतून जाणाऱ्या नागमोडी वळणाचे रस्ते माहिती नसतात. महामार्गावरुन प्रवास करताना त्यांना जिथे जायचे आहे किंवा ज्या स्थळावर जायचे आहे.  एखाद्या किनाऱ्यावर कसे जायचे, कोणता मार्ग कोणत्या किनाऱ्यावर जातो हे कळतच नाही. त्यामुळे अलीकडे गुगल मॅपच्या साह्याने अनेक जण गुगल मॅपची मदत घेतात. मात्र अनेकदा त्यांची फसवणूक होत असते अशाच प्रकार सध्या महाडमध्ये सुरू आहे.


 दापोली, गोवा, रत्नागिरी, गणपतीपुळे या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गर्दी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तीन दिवसांपासून वाढली आहे. सर्वच वाहन चालकांना पर्यटन स्थळ माहित नसल्याने अनेक वाहन चालक दिशादर्शक गुगल मॅपचा आधार घेत त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र गेल्या चार दिवसांपासून गुगल मॅप भरकटल्याने रत्नागिरी आणि दापोलीकडे जाण्याचा मार्ग महाड तालुक्यातील दासगाव हद्दीतून एका डोंगर भागातील वांद्रे कोंड या ठिकाणाहून दाखवत आहे. मॅपनुसार चालणारी वाहने थेट या मार्गावर जात आहेत. मात्र हा मार्ग अरुंद आणि खडतर आहे. हे वाहन चालकांच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा महामार्गावर परतताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेकडो वाहने या मार्गावर यामुळे जात आहेत. मात्र हा मार्ग रात्रीच्या वेळी धोकादायक असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष घलण्याचे  गरजेचे आहे.


वांद्रे कोंड ही तासगावमध्ये डोंगराजवळ  एक वाडी आहे. या वाडीचे अंतर महामार्गावरून तीन किलोमीटर आहे. या वाडीच्या पुढे कोणतेच गाव नाही. ही वाडी घनदाट जंगलामध्ये वसलेली असल्याने या भागात बिबट्यांच्या आणि रानडुकराचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षभरात अनेक जनावरे बिबट्यांनी फस्त केली आहेत. रात्रीच्या वेळी या मार्गावर चुकून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय गेली काही वर्ष सुरू असलेले मुंबई व महामार्गाचे चौपदरीकरण आणि त्यात अर्धवट असलेली कामे काही ठिकाणी रस्त्याच्या दोन लेन पूर्ण झाल्या तर काही ठिकाणी अर्धवट स्थितीत असल्यामुळे प्रवाशांना नेमकं कोणत्या ठिकाणी, कोणत्या फाट्यावरून किंवा कोणत्या नाक्यावरून आतमध्ये जायचं हे कळतच नाही. ज्या शहरातून गावातून नव्याने चौपदरीकरणाचे महामार्ग गेलेले आहेत. या महामार्गावरूनच समुद्रकिनाराकडे किंवा एखाद्या पर्यटन स्थळाकडे जाण्याचे मार्ग असल्याने तेथून किंवा महामार्गावरून खाली उतरताना किनाऱ्याकडे प्रवेश करताना त्या ठिकाणी दिशादर्शक फलक किंवा माहिती फलक लावण्यात यावे अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.


दिवाळीच्या सुट्टीनिमित्त पर्यटक आपली सफर करण्यासाठी बाहेर पडतात. कोकणात सध्या गुलाबी थंडी पडत असल्याने यावेळी मात्र पर्यटकांनी कोकणाला सर्वाधिक पसंती दिलेली आहे. कोकणातील समुद्रकिनारे, बोटींची सफर आणि निसर्गरम्य वातावरण हे पर्यटकांना नक्कीच भुरळ घालत. त्यामुळे इथे येणारा पर्यटक हा पुन्हां आल्याशिवाय राहत नाही.