कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आला आहे. कडक लॉकडाऊन नाही मात्र जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी कडक लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला होता. आज सकाळी 11 वाजल्यापासून नवे निर्बंध लागू होणार होते. मात्र लॉकडाऊनचा निर्णय मागे घेत जनता कर्फ्यूचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. 


वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 5 मे पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 15 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार होता. 


परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 5 मे 2021 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून 13 मे 2021 सकाळी सात वाजेपर्यंत जनता कर्फ्यू उत्स्फूर्तपणे पाळावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. या काळात नागरिकांनी कोणत्या बाबींचं पालन करावं, याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.




1. नागरिकांनी अत्यावश्यक सेवा, तातडीची वैद्यकीय गरज याशिवाय घराबाहेर पडू नये


2. वैध कारण असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये


3. वैद्यकीय सुविधा व सेवा पूर्ण वेळ सुरु ठेवाव्यात


4. अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी इ. दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत उघडी राहतील. परंतु नागरिकांनी दुकानात न जाता घरपोच सेवा मागवावी. अत्यावश्यक बाब नसेल तर अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू नये


5. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांनी फक्त घरपोच सेवा द्यावी.


6. अत्यावश्यक, निर्यात व निरंतर प्रक्रिया उद्योग आस्थापना यापूर्वी दिलेल्या नियंत्रणास बांधील असतील.


7. शेती व शेतीशी निगडीत त्याचप्रमाणे मान्सूनपूर्व करावयाची सर्व कामे सुरु ठेवावीत.