Maharashtra News : सध्या राज्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच वाढला आहे. अनेक जिल्ह्यात 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (State Govt) दक्ष झाले असून, आजपासून (21 एप्रिल) राज्य मंडळाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण व क्रीडा विभागाकडून असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.


Temperature : वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या एप्रिल महिन्यातच


दरम्यान, राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागवला होता. त्यानुसार वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. 


विदर्भातील शाळा या 30 जूनपर्यंत बंद 


वाढत्या उष्णतेमुळं मुलांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. राज्यातील ज्या शाळांची परीक्षा संपली आहे त्यांना सुट्टी मिळणार आहे. राज्यातील शाळांना आजपासून सुट्टी सुरु होऊन ती 15 जूनपर्यंत असेल. विदर्भातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा या 30 जूनपर्यंत बंद राहतील असं राज्य शासनाने जाहीर केलं आहे.


विदर्भ वगळता राज्यात 15 जूनपासून शाळा सुरु होणार


दरम्यान,  शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती दिली. तर विदर्भात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्या ठिकाणी 30 जून रोजी शाळा सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. मुलांना आपल्या सुट्या व्यवस्थित प्लॅन करता याव्यात यामुळं हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली. 


 देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे  ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून, दुपारच्या वेळी रस्ते रिकामे दिसत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Heat wave : देशात उष्णता वाढली, अनेक शहरात पारा 40 अंशाच्या पुढं; वाचा कोणत्या शहरात किती तापमान