पंढरपूर : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळ खुली होणार असून आज विठ्ठल भक्तांनी नियमावली जाहीर केली आहे. सात ऑकटोबर पासून राज्यातील मंदिरे सुरु होत असताना आज विठ्ठल मंदिर समितीच्या बैठकीत रोज 10 हजार भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला . विशेष म्हणजे यात 50 टक्के ऑनलाईन पद्धतीने आणि 50 टक्के थेट आलेल्या भाविकांना दर्शन मिळणार असल्याने देशभरातील भाविकांना आता विठुरायाच्या मुखदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे .
राज्यात अजून सर्वत्र लसींचा दुसरा डोस मिळाला नसल्याने दर्शनासाठी लसीकरणाची अट ठेवण्यात आली नाही. कोविड तपासणीची अट देखील नसल्याने सर्वच भाविकांना आता केवळ दर्शन रांगेत तापमान आणि ऑक्सिजन याची तपासणी करून दर्शनाला जाता येणार आहे. आज मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे मंदिर समितीची बैठक पार पडली यात हे सर्व निर्णय घेण्यात आले आहेत.
मंदिर समितीने मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठी खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला असून दर तासानंतर मंदिराची सफाई केली जाणार आहे . ज्या ठिकाणी भाविकांचे हात लागू शकतात अशा सर्व भितींची देखील वारंवार सफाई केली जाणार असल्याने कोरोनाचा संभाव्य धोका कमी होणार आहे . दर्शन रांगेत 6 फुटाचे अंतर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कर्मचारी तैनात केले जाणार असून मंदिर परिसरात कायमस्वरूपी डॉक्टर आणि वैद्यकीय पथक तैनात ठेवले जाणार असल्याचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
दर्शन रांगेत येताना तपासणी करून सोडताना सॅनिटायझर हातावर देऊन भाविकाला सोडले जाणार आहे . फक्त 65 वर्षांपुढील आणि 10 वर्षाच्या आतील भाविक तसेच गरोदर महिला आणि आजारी भाविकाला मात्र दर्शनाला सोडले जाणार नसल्याचे गुरव यांनी सांगितले . विठ्ठल मंदिरात सकाळी 6 ते 7 यावेळेत पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना दर्शन घेता येणार असून यानंतर सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत देशभरातून रोज येणाऱ्या 10 हजार भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचे गुरव यांनी सांगितले .