मुंबई :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अनेक बालकांच्या आयुष्यातून आनंद जणू हिरावूनच घेतला आहे. कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक मृत्युमुखी पडले आहेत अशा मुलांना मदत म्हणून पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे 306 अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे 15 कोटी 30 लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत दिली आहेय 


कोरोना महामारीच्या काळात अनेक मुले आई वडिलांचे छत्र हरपल्यावे अनाथ झाली होती. या अनाथ बालकांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये तसेच त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.  महिला बाल विकास विभागाच्यावतीने महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर कोविड महामारीत अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यामध्ये प्रत्येकी पाच लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 






राज्यातील गोंदिया, चंद्रपूर, सांगली, वर्धा, सोलापूर रायगड अलीबाग, रत्नागिरी, नाशिक, अमरावती आणि पुणे, नागपूर अशा विविध  जिल्ह्यांमधील बालकांच्या खात्यात पैसे वर्ग झाल्याची माहिती विभागाला नुकतीच मिळाली आहे. यामुळे या बालकांना काही प्रमाणामध्ये आर्थिक सुरक्षितता देता आली. विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी प्रयत्न केले जातील असे देखील यशोमती ठाकूर यांनी सांगितले.या निर्णयामुळे या बालकांना काही प्रमाणात आर्थिक सुरक्षितता देता आली असून विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.