Osmanabad News: औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, आता गुगुल मॅपवर (Google Map) औरंगाबाद शहराचे नाव 'संभाजीनगर' तर उस्मानाबाद जिल्ह्याचे 'धाराशिव'  असा उल्लेख करण्यात आला आहे. गुगुल मॅपवर औरंगाबाद किंवा उस्मानाबाद टाईपं केल्यावर इंग्रजीत 'संभाजीनगर' (Sambhaji Nagar)  आणि धाराशिव (Dharashiv) असा उल्लेख दाखवत आहे. गेल्या आठवड्याभरापासून नामांतराच्या मुद्यावरून वाद पेटला असतांना आता गूगलच्या उल्लेखाने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्यावरून राष्ट्रवादीच्या अने पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. 


गेली अनेक वर्षे उस्मानाबाद जिल्ह्याचा नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्याची मागणी शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून नेहमीच केली जाते. प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा आघाडीवर असतो. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनाच्या पलीकडे काहीच होत नव्हते. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यांनतर आता गुगल मॅपकडून उस्मानाबादचं 'धाराशिव'  उल्लेख करण्यात आला आहे.


औरंगाबादचाही उल्लेख संभाजीनगर


ज्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्याचा गूगल मॅपवर धाराशिव असा उल्लेख करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे औरंगाबादचा उल्लेख सुद्धा संभाजीनगर करण्यात येत आहे. राज्यात नामांतरावरून सुरु असलेल्या घडामोडी पाहता गूगल मॅपवर दोन्ही जिल्ह्याचे अचानक नाव बदल्याने याची सोशल मीडियावर चर्चा आहे. तर कुणी यांचं समर्थन करत आहे तर कुणी विरोध करत आहे. त्यामुळे आगामी काळात यावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता विरोध...


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी याला विरोध केला होता. तर महाविकास आघाडीने घेतलेल्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर नामांतराच्या निर्णयाबाबत आम्हाला कल्पना नव्हती अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दिली होती.