मुंबई : ईडीच्या कारवाया, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सध्याचे राजकारण अशा विविध विषयांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी तुफान फटकेबाजी केली. आपला रुपया सच्चा मग दडपशाहीला घाबरण्याचं कारण नाही, असे शरद पवार म्हटले आहे. 'महाराष्ट्र कनेक्ट' या कार्यक्रमात शरद पवार आणि संजय राऊत यांची मुलाखत ज्ञानेश महाराव घेतली त्यावेळी शरद पवार बोलत होते. शरद पवारांनी राजकीय विषयांसह वैयक्तिक जीवनातील घडामोडी या मुलाखतीत उलगडल्या.
शरद पवारांची मुलाखत जशीच्या तशी
प्रश्न - तुम्ही हनुमान चालीसा प्रकरणात बृजभुषण सिंह यांना मॅनेज केले असे म्हटल गेलं?
उत्तर - बृजभुषण सिंह ही कोणी मॅनेज करु शकेल अशी व्यक्ती नाही. कुस्तीच्या क्षेत्रात आम्ही एकत्र काम करतो. पण प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. बृजभुषण सिंह यांना मॅनेज करण्यात आलं हे डोक्यातून काढून टाका.
प्रश्न- सोशल मीडियावर जे चालते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
उत्तर- काही गोष्टी गांभीर्याने मांडायच्या असतात. त्यासाठी स्पष्टता हवी. सोशल मीडियावर गांभीर्यता नाही.
प्रश्न - तुम्ही या वयात इतके कसे प्रवास करता?
उत्तर- लोकांमध्ये जाऊव काम केलं की उर्जा मिळते.
प्रश्न- तुमची स्मरणशक्ती इतकी दांडगी कशी?
उत्तर- मी यशवंतराव चव्हाण यांच्याकडून हे शिकलो. त्यांचे राजकारण आणि समाजकारण यशस्वी होण्यास ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्यामधे एखाद्या व्यक्तीचा पहिल्या नावाने उल्लेख करणं हे होतं. एकदा माझ्या मतदारसंघातील एक महिला मुख्यमंत्री असताना तिचे काम घेऊन मुंबईत आली. मी त्या महिलेला म्हटलं कुसुम काय काम काढलं? मी नावाने हाक मारल्यावर ती तीचे कामच विसरुन गेली आणि गावाकडे सगळ्यांना सांगितले की मला साहेबांनी नावाने ओळखले. आधी माझ्या मतदारसंघातील पन्नास टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसे नाही. आता त्याने आजोबांचे नाव सांगितलं की कळतं हा कोणाचा आहे.
प्रश्न- ईडीमुळे कितपत त्रास होतोय?
उत्तर - हे गंभीर आहे. मला जेव्हा ईडची नोटीस आली तेव्हा मी म्हटलं की मीच येतो. मग ईडीचे अधिकारी हात जोडत आले की तुम्ही येऊ नका. त्यासाठी आपले नाणे खणखणीत हवं.
प्रश्न- काश्मीर फाईल्समध्ये खोटी परिस्थिती दाखवली.
उत्तर- भाजपने काश्मीरमधील पंडितांची हत्या इतरांच्या कार्यकाळात झाल्या असा खोटा प्रचार केला. आधीही भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या सरकारच्या काळात पंडितांच्या हत्या झाल्या
प्रश्न- आज ज्या विचारसरणीचा प्रचार होतोय ते पाहता आपणही काही करायला हवं असं वाटत नाही का?
उत्तर- सध्याच्या मीडियावर भाजपचा दबाव आहे किंवा ज्याच्या हातात मीडिया आहे त्यांच्यावर भाजप सरकारचा दबाव आहे
प्रश्न - बाळासाहेब ठाकरेंना महाविकास आघाडीचा प्रयोग आवडला असता का?
उत्तर : बाळासाहेब ठाकरेंना हा प्रयोग आवडला असता.
प्रश्न -आज एखाद्याची नास्तिकता किंवा आस्तिकता तपासली जाते हे बरोबर आहे का?
प्रश्न - हे बरोबर नाही. मी एखाद्याची कशावर श्रद्धा आहे की नाही याचा कधीच विचार केला नाही. मी पंढरपुरात गेलो तर पांडुरंगासमोर हात जोडतो. कारण महाराष्ट्रातील करोडो कष्टकऱ्यांची विठ्ठलावर श्रद्धा आहे. करोडो लोक विठ्ठलाला संकटमोचक मानतात. त्यांच्या श्रद्धेला केलेला तो नमस्कार असतो.
प्रश्न- रोहित पवार नामदार होणार का? ( मंत्रीपद मिळेल का)
उत्तर-मी 1967 ला आमदार झालो तेव्हा मला नामदार व्हायला पाच वर्षं थांबावं लागलं होतं.
प्रश्न- तुम्ही अनेक कृषीविषयक संस्थाशी निगडित आहात. तुम्हाला कधी आंबा खाल्याने मुलं होतात असा आंबा आढळला का?
उत्तर - या सगळ्या खुळचट कल्पना आहेत.