Chhagan Bhujbal : सुहास कांदे (Suhas Kande) हे सक्षम, कार्यसम्राट आमदार असून त्यांच्याकडे भुसेनी (Dada Bhuse) लक्ष द्यायला पाहिजे, असे सूचक वक्तव्य भुजबळ यांनी केले. नाशिकमधील (Nashik) सिडकोचे कार्यालय (CIDCO Office) हलवण्यामागे नेमका हेतू काय ? असा सवाल उपस्थित करत राज्य शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करत नाशिकमध्ये सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवावे. त्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी देखील पूर्ववत कायम ठेवण्यात यावेत. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
ते म्हणाले की, नाशिकच्या सिडको वसाहतीत तीन लाखाहून अधिक नागरिकांची वसाहत आहे. या वसाहतीतील नागरिकांचे बरेच काम अद्यापही सिडकोकडे असताना अचानक सिडकोची कार्यालय बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे असे सांगत हा निर्णय कोणाच्या दबावत आहे हे अद्याप कळत नाही असे त्यांनी सांगितले. एकीकडे नाशिकचे अनेक प्रकल्प, विमाने कार्यालय पळविले जात आहे. आता सिडकोचे कार्यालय सुद्धा हलविण्यात आले आहे. पळविण्याचा हा सिलसिला सुरूच असून यावर शहरातील आमदार खासदार नेमकं काय करताय यामागे अन्य काही कारण आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सर्वसामान्य सिडकोवासियांसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवे असे त्यांनी सांगितले. यासाठी आपण स्वतः पत्रव्यवहार केला असून अधिवेशनात देखील हा प्रश्न उपस्थित केला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, नुसतं कुणाला हात लावून बाजूला करणे हा विनयभंग होत असेल तर लोकलमध्ये हजारो महिला पुरुष प्रवास करतात यामध्ये अनेकांना रोज धक्का लागतो अशावेळी तर दररोज लाखो गुन्हे दाखल होतील असे सांगत आमच्याविरुद्ध देखील चुकीच्या पद्धतीने यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहे ही बाब अतिशय चुकीची असल्याचे ते म्हणाले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली कारवाई शेवटी सरकारवरच उलटली अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच कुठल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले की, देशातील लोकशाही व्यवस्था टिकण्यासाठी न्याय व्यवस्थेची भूमिका अतिशय महत्वाची आहे. न्यायव्यवस्थेकडून येणाऱ्या चांगल्या निणर्यामुळे देशातील नागरिकांचा न्यायालयांवर विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यामुळे आजही देशातील नागरिक न्यायाची अपेक्षा ही न्यायालयाकडून करतात असेही ते म्हणाले. बदलाच्या भावनेनं कोणीच वागू नये, आपली संस्कृती वेगळी आहे हे तुम्हीच सांगतात ती जपा. उध्दव ठाकरे वेळ देत नाही अशी ओरड करत होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मला भेटत नाही. कोणाला भेटावे कळत नाही, मुख्यमंत्री नी आमदारांसाठी वेळ द्यायला पाहिजे. मी सीनिअर आमदार आहे, मलाही भेटावे असा सल्ला भुजबळांनी यावेळी सीएम डीसीएम यांना दिला.
राहुल गांधी तयार होत आहेत...
राज्यातील जनता नव्या सरकार वर प्रेम करत आहेत असे वाटत नाही. त्यामुळे निवडणूक लवकर लागतील असे वाटत नाही. निवडणूक कधी ही घ्या सर्व पक्ष कायम तयार असतात. राहुल गांधींना सहानुभूती मिळतेय, प्रतिसाद मिळतोय त्याचा परिणाम गुजरात निवडणुकीत बघायला मिळेल. पप्पू म्हणून त्यांना विरोधकांनी हिणवुन तयार केले. त्यांच्या डिग्री खरी आहे. राहुल गांधी तयार होत आहेत. तर दुसरीकडे आव्हाडांच्या प्रकरणांवर बोलताना म्हणाले कि, जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईला करून सरकारची प्रतिमा वाढली का? गर्दीत हात लागतो, लोकल मध्ये तर किती धक्के बसतात? विनयभंग गुन्हा चुकीचा असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ना सांगायचे आहे, कि दोघेही समजदार आहेत. कोणाला बदनाम करण्यासाठी तक्रार दाखल करण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुहास कांदे हे सक्षम, कार्यसम्राट आमदार..
उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख शहर नाशिक असून मुख्यमंत्री येताय जाताय पण सिडकोच्या मुद्याकडे लक्ष देत नाही. उपमुख्यमंत्री यांनीही लक्ष दिले पाहिजे. हिवाळी अधिवेशनात आम्ही आवाज उठविणार असून नाशिकच्या आमदारांनी हिम्मत करून नाशिकसाठी उभे रहावे. कार्यालय नाशिकमध्ये थांबावं ही आमदार खासदार यांची इच्छा आहे का? यामागे अर्थकारण राजकारण काय? सुहास कांदे हे सक्षम, कार्यसम्राट आमदार असून त्यांच्याकडे भुसेनी लक्ष द्यायला पाहिजे, असे सूचक वक्तव्य भुजबळ यांनी केले.