Nashik Crime : नाशिकसह जिल्ह्यात (Nashik District) आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रोजच शहरातील अनेक भागात आत्महत्येच्या (Suicide) घटना उघडकीस येत आहेत. यात तरुण-तरुणीचे प्रमाण वाढत असून मानसिक स्वास्थ्य आणि इतर कारणांतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जात आहे. नाशिक शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.


नाशिक शहरातील (Nashik) सिडको परिसरात उपेंद्रनगर भागात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामदास मुरलीधर रोकडे यांनी काल (10 एप्रिल) दुपारच्या सुमारास राहत्या घरातील हॉलमधील सीलिंग पंख्याच्या कडीला दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर समाधान काशीनाथ रोकडे यांनी अंबड पोलीस ठाण्यास कळवले. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक बनतोडे करत आहेत. आत्महत्येची दुसरी घटना अंबड भागातील कर्मयोगीनगर येथे घडली आहे. सागर रतन कुमार याने काल दुपारच्या सुमारास राहत्या घराच्या बेडरुममध्ये सीलिंग फॅनच्या कडीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर सुयोग रतनकुमार ढेपे यांनी ही माहिती अंबड पोलीस ठाण्यास कळवली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.


शहरातील उंटवाडीजवळ आत्महत्येचा तिसरा प्रकार घडला. रवींद्र मन्साराम पाटील यांनी राहत्या घरातील बेडरुममध्ये पंखा आणि भिंतीच्या हुकाला बांधलेल्या लहान बाळाच्या झोक्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. या प्रकरणी कुणाल रवींद्र पाटील याने दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक टिळेकर करत आहेत. आत्महत्येची चौथी घटना सिडको परिसरातील कामटवाडेत घडली आहे. महेश मधुकर आडीवडेकर याने राहत्या घराच्या बेडरुममधील छताच्या हुकाला साडी बांधून तिच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्याचा मावसभाऊ आकाश संजय घाडगे याच्या लक्षात आल्यानंतर त्याने अंबड पोलीस ठाण्यास ही माहिती कळवली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


जिल्ह्यात दोंघांनी स्वतःला संपवलं 


दिंडोरी तालुक्यातील (Dindori) मडकीजांब येथील 20 वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहुल अरुण मोरे या तरुणाचे नाव आहे. त्यास वडील अरुण मोरे यांनी तात्काळ मेडिकल कॉलेजला उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना येवला तालुक्यातील लोकी शिरसगाव परिसरात घडली आहे. येथील अवघ्या अठरा वर्षीय मुलीने विषारी औषध सेवन आत्महत्या केल्याची घटना घडली. तिला उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला आहे. याबाबत येवला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.