Nashik News : मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) सिन्नरच्या (Sinnar) ईशान्यश्वेर मंदिराला भेट दिल्यापासून चांगलेच चर्चेत आले आहे. यावर मंदिर प्रशासनाने खुलासा पत्र जाहीर करत आपली भूमिका देखील मांडली आहे. आता या मंदिर प्रशासनाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं खुले आव्हान केले असून 'अंकाद्वारे भविष्य पाहणे हे शास्त्र आहे, हे सिध्द करा व एकवीस लाख रुपये जिंका' असे चॅलेंज केले आहे. 


दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिन्नर (Sinnar दौऱ्यावर होते. त्यावेळी शिर्डी साईबाबा दर्शनानंतर त्यांनी सिन्नर येथील ईशान्यश्वेर मंदिरात (Ishanyshwer Temple) दर्शन घेतले. यानंतर वादाला तोंड फुटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांना सोबत घेऊन नाशिक (Nashik) जिल्ह्यातील ईशान्येश्वर मंदिरात भविष्य पाहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले. अशातच ईशान्येश्वर मंदिरातील खुलासा पेंटर लिहून, सदर ठिकाणी कुंडली पाहिली जात नाही किंवा हात ही पाहिले जात नाही, असे स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला. अंनिस ईशान्येश्वर मंदिराचा हा दावा मान्य करत मंदिर प्रशासनाला आव्हान दिले आहे. 


अंनिसच्या मते 'अंकशास्त्रात कुंडली अथवा हात पाहिला जात नाही. त्यांनी ज्योतिष पाहत असल्याचा दावा खोडून काढला नाही. ते अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहत नसेल तर तसा फलक त्यांनी मंदिरात लावावा व जनता फसवणूकीपासून दुर राहावी म्हणुन तसे हमीपत्र लिहून द्यावे. अन्यथा अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिध्द करावे. तसे केल्यास अंनिस जनतेतून मिळविलेले एकवीस लाख रुपये त्यांना बक्षीस देईल, असे आव्हान महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह  कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे. मुख्यमंत्री यांनी रुद्र पुजा करण्यास अंनिसचा विरोध नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकास श्रद्धा व उपासनेचा आधिकार दिला आहे. मात्र मुंबईच्या महत्त्वाच्या बैठका रद्द करून व गोपनीयता राखत प्रोटोकॉल तोडून हा दौरा झाला. मुख्यमंत्र्यांना रुद्र पुजा करायची तर मुंबईला अथवा कुठेही करु शकत होते. मात्र ईशान्येश्वर मंदिरात केली. कारण अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहुन हा तोडगा केला असावा, असा संशय अंनिस ने व्यक्त केला आहे.
                    
काय म्हटलंय मंदिर प्रशासनाने?
दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी सिन्नरच्या ईशान्येश्वर मंदिरात भेट दिली. या भेटीनंतर हे मंदिरे चर्चेत आले होते, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर राष्ट्रवादीचे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील टीका केली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ईशान्येश्वर मंदिराकडून याबाबत खुलासा देण्यात आला आहे. त्यानुसार पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात येऊन पूजा केली. दर्शन घेऊन ते माघारी फिरले. न्यासाचे मंदिर स्थापनेपासून कधीही कोणाचाही हात पाहिला जात नाही किंवा कोणाचाही कुंडली पाहिली जात नाही. तसेच न्यासाच्या मंदिरात कोणीही बाबा नसल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.