Nashik CIDCO : सिडको प्रशासन कार्यालय (CIDCO) बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राजकीय पक्ष व नागरिकांनी केलेले आंदोलनाने निर्माण झालेला असंतोष लक्षात घेता राज्य शासनाने अखेर सिडको कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोच्या नवी मुंबई (Mumbai) येथील व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवून आवश्यक कर्मचारी ठेवून कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


नाशिक (Nashik) येथील सिडकोचे कार्यालय (CIDCO Office) बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. यामुळे नागरिकांना ना हरकत दाखला, मिळकत हस्तांतरण, यासारखी महत्वाची आणि लहान-मोठी कामे करण्यासाठी सामान्य नागरिकांना औरंगाबाद (Aurangabad) येथे फेऱ्या माराव्या लागणार होत्या. या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष संघटनाकडून या निर्णयास विरोध करण्यात येत होता. शिवाय नागरिकांची घरे फ्री होल्ड करून द्यावी, त्यानंतरच कार्यालय बंदच निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती. यासाठी शिवसेनेने देखील या निर्णयास विरोध केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिडको प्रशासनाचा विरोधात जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला होता. या सर्वांच्या मागणीला अखेर यश आले आहे. 


सिडकोतील सहा गृहनिर्माण संस्थांच्या हस्तांतरण महापालिकेकडे झाल्याने आता कोणत्याही प्रकारचे काम शिल्लक नसल्याने सिडकोचे नाशिक मधील कार्यालय बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र त्यानंतर अनेक स्तरावरून विरोध करण्यात आला. सिडकोतील घरांच्या हस्तांतर करताना परवानगी लागते.  त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे कार्यालय बंद करण्यास विरोध होत होता. शिवसेनेसह अनेक पक्षांच्या प्रमुखांनी त्यास विरोध करत असताना बाळासाहेबांची शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांनीही फेरविचार करून प्रसंगी कार्यालय सुनील ठेवण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर शासनाने कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


नाशिक येथील कार्यालयात आवश्यक तेवढे कर्मचारी ठेवण्याचे सांगून इतर अधिकारी कर्मचारी विशेषत तांत्रिक संवर्ग यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सिडको ने भाडेपट्ट्यांनी दिलेल्या जमिनी होल्ड ते फ्री होल्ड करण्याच्या कारवाई अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे आता काम करण्यासाठी आवश्यक असणारा कमीत कमी कर्मचारी वर्ग नाशिक कार्यालयात कायम ठेवावा. त्याचबरोबरव इतर कर्मचाऱ्यांना इतरत्र पदस्थापना देण्यात यावी असेही आदेशात म्हटले आहे.


औरंगाबादला हलविणार होते कार्यालय
नाशिकमध्ये सिडकोची स्थापना ही शहराचे नियोजन करुन ते विकसित करण्याच्या उद्देशाने 1970 साली करण्यात आली होती. नाशिक सिडकोच्या कार्यक्षेत्रातील सेवा सुविधा पूर्ण केल्यांनतर त्याचे हस्तांतरण नाशिक महानगरपालिकेकडे करण्यात आले असल्याने सिडको कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. घर हस्तांतरणाचे अधिकार सिडकोने स्वतःकडे ठेवलेले असल्याने उत्पन्नाचा मार्ग सुरू राहिल्याने हे कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने आदेश देत हे कार्यालय औरंगाबाद येथे हलविण्याचे आदेश दिले होते. मात्र राहिलेल्या नागरिकांना घरे मिळेपर्यंत हे कार्यालय नाशिकमध्येच राहणार असल्याचे समजते.