Nashik Onion Issue : राज्यभरात (Maharashtra) कांदा प्रश्न चांगलाच पेटला असून आज (28 फेब्रुवारी) सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सभागृहात (Budget Session) याच प्रश्नावरुन चांगलीच खडाजंगी दिसून आली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि चांदवड मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर (Rahul aher) यांच्यात कांदा प्रश्नांवरुन रस्सीखेच पाहायला मिळाली. 


गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न (Onion Rate) चांगलाच पेटला असून यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. दुसरीकडे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस असून सकाळी कांदा प्रश्न चांगलाच पेटल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या (NCP Protest) काही आमदारांनी डोक्यावर कांद्याची टोपली गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यानंतर देखील विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर सुरुवातीला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कांद्याचा मुद्दा प्रकर्षाने घेण्याची मागणी केली. यानंतर छगन भुजबळ यांनी कांदा प्रश्नी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, नाफेडने कांदा खरेदी सुरु करावी, शेतकऱ्यांना वेठीस धरु लवकरात लवकर हा प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे भुजबळ म्हणाले. 


दरम्यान भुजबळ बोलल्यानंतर चांदवडचे भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कांदा प्रश्नी मत मांडण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, "निर्यात खुली असून नाफेड देखील आजपासून कांदा खरेदी करण्यास सुरवात केली आहे. एकीकडे कांद्याची अवाक वाढली असून दुसरीकडे बाजारभाव पडले आहेत. मात्र आम्ही राज्य सरकारकडे हमीभाव द्यावा अशी मागणी करत असल्याचे ते म्हणाले. एवढ्यात भुजबळ यांनी आहेर यांना थांबवत रोष व्यक्त केला. यावेळी अध्यक्षांनी भुजबळांना थांबवत त्यांना बोलू द्या," असं सांगितलं. यावेळी आपला मुद्द मांडताना डॉ. आहेर म्हणाले की, "केंद्र राज्य सरकारकडे कांद्याला योग्य भाव देण्यासाठीची मागणी आम्ही देखील करत आहोत, आम्हाला देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे."


कांद्याचे दर कोसळले


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने कांद्याचे दर कोसळले आहेत. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होत असून लासलगाव ही आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. काल या बाजार समितीत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कांदा लिलाव बंद पाडले. तर दुसरीकडे आज कांदा प्रश्न विधीमंडळात मांडत असताना अशाप्रकारे जिल्ह्यातील दोन्ही आमदार एकमेकांसमोर भिडल्याने नेमके शेतकऱ्याचे प्रश्न तरी कसे सुटणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. 


विरोधकांचे जोरदार आंदोलन 


यावेळी सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उद्ध्वस्त... शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो... कांद्याला भाव मिळालाच पाहिजे... कापसाला भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरुवातीलाच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून राष्ट्रवादी आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.