परभणी  : राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र असे असताना राज्य शासनातील मंत्रीच कोरोना संसर्ग वाढवत असल्याचे समोर आले आहे. काल परभणीच्या गंगाखेड शहरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन केले आणि 24 तासातच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमदारांपैकी एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता उर्वरित आमदार,खासदार मंत्री अधिकारी यांच्या हे सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय..


परभणीच्या गंगाखेड शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन काल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासनाने निर्बंध लागू केले याच्या एक दिवस अगोदर हे उद्घाटन पार पडले. या उद्घाटनाला सेनेचे खासदार संजय जाधव,राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी,शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह अनेक माजी आमदार,सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे त्याचप्रमाणे अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांच्यासह अनेक अधिकारी व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. एवढेच नाही तर हे उद्घाटन झाल्यावर चव्हाणांनी विश्रामगृहात जेवणं घेतले,पत्रकार परिषद घेतली. यानंतर काँग्रेस शहर कार्यालयाचे उद्घाटन केले आणि पुन्हा एक कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला. एवढंच नाही तर माजी आमदार सीताराम घनदाट,डॉ मधुसूदन केंद्रे,नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांच्या घरी भेटी देऊन चर्चा ही केली. या वेळी त्यांच्यासमवेत कार्यकर्ते पदाधिकारी होतेच..


आता रेल्वे उड्डाणपुलाचा उद्घाटन समारंभ पार पडला आणि 24 तासात गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले. कालच्या उदघाटन कार्यक्रमाचे व्हिडीओ फोटो पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की अनेक वेळा या नेत्यांनी मास्क काढले आणि त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला. आता प्रश्न हा आहे की, आमदार रत्नाकर गुट्टे पॉझिटिव्ह आल्यानंतर या कार्यक्रमाला जे उपस्थित होते त्यांच्या तपासण्या होणार का आणि ते सुरक्षित आहेत का?