Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुण्यात श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचं समोर आलं. त्याच बरोबर, सी आणि डी सेटच्या प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचंही आढळलं, यामुळे विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या परीक्षेवर बहिष्कार टाकत निषेध नोंदवला.
महाज्योतिचा पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्याच्या प्रकरणावरुन परीक्षार्थींचा गोंधळ उडाला, यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. नागपूरच्या कमला नेहरू कॉलेज केंद्रावरील ही घटना असून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेर आले.
राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'हिट अँड रन ' कायद्याविरोधात मनमाडमधील टँकर चालक पुन्हा संपावर गेले आहेत. मध्यरात्री 12 वाजेपासून टँकर चालक पुन्हा संपावर गेले आहेत. टँकर चालकांनी 'स्टिअरिंग छोडो' आंदोलन सुरू केल्याने मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशचा इंधन पुरवठा ठप्प होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर या गावातील शेतकऱ्यांनी राजकीय पुढारी आणि राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी केली आहे. निवडणुकीसाठी प्रचार करण्यासही गावात बंदी करण्यात आली आहे, तशा प्रकारचे फलकही गावाच्या वेशीवर लावण्यात आले आहेत. सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतमालावर निर्यात बंदी लावून शेतमालाचे भाव पाडले आहेत. कापूस सोयाबीनलाही भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. विरोधी पक्षही यावर काहीही बोलण्यास तयार नाही, असा आरोप करत सर्वच राजकीय पक्षांना देऊळगाव धनगर या गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राजकीय पुढारी गावात येतात का यावर लक्ष ठेवण्यासाठी तरुण शेतकऱ्यांचे पथकही गावाच्या वेशीवर गस्त घालत आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानांतर्गत महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सभा पार पडणार आहे, या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. आज राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेचा निकाल देणार आहेत. आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे सभा घेत आहेत. दुपारी साधारणतः दोन ते अडीच वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी पोहोचतील.
Ravindra Waikar ED Raids: जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरी सकाळी 7 वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरू होती. तब्बल 15 तासानंतर रवींद्र वायकरांची ईडी चौकशी संपली. वायकर यांच्या जोगेश्वरीतील श्याम नगर तलावाजवळील सेवालय कार्यालय आणि मातोश्री क्लबमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व पेपरची तपासणी केल्याची माहिती मिळत आहे. वायकरांशी संबंधित 4 ठिकाणी ईडीची छापेमारी झाल्याचं समोर येत आहे, तर 17 जानेवारीला पुढील चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना रवींद्र वायकरांना देण्यात आल्या आहेत.
Gabriel Attal Becomes France Youngest PM: फ्रान्स : फ्रान्सच्या (France) पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न (PM Elisabeth Borne) यांनी सोमवारी (8th January 2024) आपल्या पदाचा राजीनामा दिला. इमिग्रेशनच्या मुद्द्यावरून वाढत्या राजकीय तणावामुळे पंतप्रधान एलिझाबेथ यांनी राजीनामा दिला. एलिझाबेथ बोर्न यांनी राजीनामा दिल्यानंतर 34 वर्षीय गॅब्रिएल अटल फ्रान्सच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपूर्वी मोठे फेरबदल केले आहेत. गॅब्रिएल हे फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलिंगी पंतप्रधान बनले आहेत. 2022 मध्ये सर्वात तरुण मंत्री म्हणून शपथ घेणारे गॅब्रिएल आतापर्यंत शिक्षण विभागाची जबाबदारी सांभाळत होते. मंगळवारी त्यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Rahul Narwekar on MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर निकालासंदर्भात जी काही प्रक्रिया पुर्ण करून आम्ही निकाल देण्याचा प्रयत्न करू निकाल देताना जवळपास 34 याचिका होत्या त्यामुळे निकाल देताना वेळ लागणारच राष्ट्रवादी पक्षाचा देखील 30 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
MLA Disqualification Case: महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय आज दुपारी चार वाजल्यानंतर येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाचतील. या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे. साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीचा निर्णय येणार असल्यानं सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदेच अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा दणका असेल. कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ 16 आमदार शिल्लक आहेत, त्यातील 14 अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घ्या...
आज महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडणार आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीकडे लागलं आहे...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -