Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Feb 2024 02:40 PM
Pune News : पुणे विद्यापीठ चौकाजवळ मालवाहू ट्रेलर उलटला; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Pune News : पुण्यात अपघाताचं प्रमाण आणि वाहतूक कोंडीचं प्रमाण सातत्याने वाढतंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक राजभवनजवळ मालवाहू ट्रेलर उलटला आहे. ब्रेमेन चौकातून येणारी वाहतूक काही बोपोडीच्या दिशेने वळवण्यात आली आहे. ट्रेलर उलटल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.


गणेश खिंड रस्त्यावरील विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामासाठी आलेला मालवाहू ट्रेलर राजभवनजवळ चतु:शृंगी पोलीस ठाण्यासमोर युटर्न घेताना उलटला. पहाटेच्या चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे ब्रेमेन चौकातून विद्यापीठासमोरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बोपोडीमार्गे वळविण्यात आली आहे. या घटनेमुळे दररोज सकाळी विद्यापीठ चौकासमोर होणाऱ्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.

Maharashtra News Live Updates : "ओबीसींचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवताय"; हरिभाऊ राठोडांचे भुजबळ, तायवाडेंवर टीकास्त्र

Maharashtra News Live Updates : ओबीसी नेते मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये म्हणून विरोध करत आहे. यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाजात संघर्ष पाहायला मिळतोय. यावरून माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडे यांच्यावर टीका केली आहे. ओबीसींचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवताय, असे त्यांनी म्हटले आहे.


 

Maharashtra News : उल्हासनगरमधील गोळीबारानंतर अजित पवार संतापले म्हणाले; कायदा हातात घेणं चांगलं नाही

Maharashtra News : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच  गोळीबार  झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, या संदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार, अशी  प्रतिक्रिया  अजित पवारांनी  दिली आहे. 


अजित पवार म्हणाले, उल्हासनगरमध्ये झालेली घटना आपण पाहिली असून वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता.संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे.मात्र त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये.याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. 

Maharashtra News Live Updates : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

Maharashtra News Live Updates : 'पोलिसांनी संरक्षणासाठी आपल्याला पिस्तूल दिले आहे. कुणाला मारण्याकरता पिस्तूल आपल्याला दिले नाही. आमदारांनी कुठे मारलं काय मारलं ते मला माहित नाही. जोपर्यंत मी घटनेची पूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत याबाबत वाच्यता करणं चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या वादप्रकरणी दिली आहे.


 

Maharashtra News : गहिनीनाथ गडावर धनंजय मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांना बांधला फेटा

Maharashtra News : आज संत वामन भाऊ यांची 48 वी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथी समारोहाला उपस्थित राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे गहिनीनाथ गडावर आले आहेत. प्रथेप्रमाणे संत वामनभाऊ यांची महापूजा धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडली यावेळी प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांचा यावेळी गहिनीनाथ गडा करून सत्कार झाला यावेळी धनंजय मुंडे यांनी स्वतः प्रकाश आंबेडकर यांना फेटा बांधून त्यांचं स्वागत केलं धनंजय मुंडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये बराच काळ चर्चा सुरू होती.

Solapur News : अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची सुप्रिया सुळे वर पुन्हा एकदा टीका  

Solapur News : सुप्रिया ताई देशाच्या खासदार आहेत. कधीतरी देशाच्या प्रश्नावर बोलत चला. या घटनेमध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न कुठे येतो. गोळीबार करायला गृहमंत्र्यांनी आमदाराला सांगितले होते का? घटनेची चौकशी होईल, कारवाई होईल पण गृहमंत्री जबाबदार कसे? अशा शब्दांत टीका केली आहे. तसेच, राज्यात अनेक घटना घडतात, असे राजीनामा द्यायचं म्हटलं तर दिवसात शंभर राजीनामे द्यावे लागतील. कायदा आणि सुव्यवस्था नक्कीच गृहमंत्री यांची जबाबदारी आहेत, ते काम योग्य पद्धतीने काम करतायत.


 


 


 

Amravati News : तिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्यांनी उध्वस्त

Amravati News : येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे डुक्कर घुसतात न त्यांना झटका लावलाच पाहिजे काँग्रेसच्या नेत्यांवर टिका करताना भाजप खासदार अनिल बोंडे यांची पुन्हा जीभ घसरली. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा वाट पेटण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या तिवसा शहरात कबड्डी सामन्याच्या उद्घाटनात भाजप नेते अनिल बोंडे यांचं वादग्रस्त वक्तव्य. ज्याप्रमाणे शेतात डुक्कर येऊ नये म्हणून झटका मशीन लावली जाते तसाच झटका काँग्रेसला दिला पाहिजे असेही अनिल बोंडेंनी वक्तव्य केलं आहे. 

Maharashtra News : ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीतील नागरिकांना जखमी करणारा माकड जेरबंद; भंडारा वन विभागाची कारवाई

Maharashtra News : जवाहरनगर इथल्या ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीतील नागरिकांना माकडानं चावा घेऊन तिघांना जखमी केलं होतं. वसाहतीत उच्छाद मांडणाऱ्या माकडाला भंडारा वन विभागाच्या वन्यप्राणी बचाव दल पथकाच्या अनिल शेळके यांनी ट्रँग्यूलाईज करून बेशुद्ध करीत जेरबंद केलं. त्यानंतर या वसाहतीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वनविभागानं या माकडाला निसर्गाच्या अधिवासात सोडलं.

Jalgaon News : अमळनेरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सांस्कृतिक विचारधारा शोभा यात्रा 

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कालपासून 97 वे मराठी साहित्य संमेलन होत असताना आजपासून उद्यापर्यंत याच अमळनेर शहरात विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. यामधे विद्रोही साहित्याचे लिखाण करणारे अनेक साहित्यिक सहभागी झाले आहेत. मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने काल ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती. तर विद्रोहीतर्फे सांस्कृतिक विचारधारा शोभा यात्रा काढण्यात आली आहे.


 

Maharashtra News Live Updates : सेवानिवृत्त सैनिकांचे जंगी स्वागत....

Maharashtra News Live Updates : भारतीय सैन्य दलात 20 वर्ष भारतमातेची सेवा बजावून मायभूमीत परतलेल्या नांदगावच्या लोहशिंगवे गावातील भूमिपुत्र असलेल्या देविदास पवार या जवानाचे ग्रामस्थानी जंगी स्वागत केले. तिरंगा ध्वज लावून सजविलेल्या उघड्या जीपमधून डी. जे. च्या तालावर देशभक्तीपर गीतांवर पवार यांची सहपत्नीक मिवरणूक काढण्यात आल्याने संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले होते. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पवार यांचा सत्कार करीत देशसेवा बजावल्याबद्दल त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Maharashtra News : कोकणातील दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभर करणार दौरे

Maharashtra News : सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान, कोकणातील दौरा संपल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. राज्यातील विविध भागांत, लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सभा होईल अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिना उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी दिली आहे.

Maharashtra Live Updates : गोंदिया जिल्ह्यातील माहुरकुडा जलाशयावर प्रथमच 'रेड क्रेस्टेड' पक्ष्यांचे आगमन

Maharashtra Live Updates : तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. यात अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या माहुरकुडा तलावावर 'रेड क्रेस्टेड पोचार्ड' या स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले असून हे विदेशी पक्षी, पक्षीमित्र आणि अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 


अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावांवर मोठ्या प्रमाणात जैव विविधता टिकून असल्याने पक्ष्यांसाठी खाद्य सामग्री मोठ्या प्रमाणात टिकून आहे. त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल होतात. मात्र, माहुरकुडाचा तलाव या बाबतीत उपेक्षित होता. दरवर्षी येथे स्थलांतरित पक्षी हजेरी लावत नव्हते. मात्र, या वर्षी पहिल्यांदाच विदेशी पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात या तलावावर हजेरी लावली आहे. या तलावावर विदेशी पाणपक्ष्यांचा वावर आणि किलबिलाट हे पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमींचे लक्ष वेधणारे आहे. माहुरकुडाच्या तलावावर पहिल्यांदाच एका विशिष्ट प्रजातीची मुबलक प्रमाणात संख्या थक्क करणारी असून या ठिकाणी अंदाजे 400 ते 500 रेड क्रेस्टेड पोचार्ड पक्षी गेल्या आठ दिवसांपासून मुक्कामी आले आहेत. मागील 15 वर्षांच्या संख्येची बेरीज केली तरी यावर्षी जेवढे पक्षी आले आहेत त्यापेक्षा जास्त पक्षी यावर्षी एकाच तलावावर आले असा पक्षी अभ्यासकांचा अंदाज आहे. या तलावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर बुटाई तलाव आहे. त्या ठिकाणी दरवर्षी ग्रेलेग गूज, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, युरेशियन पिन टेल, कॉमन कुट आणि इतर प्रजातीचे स्थानिक आणि स्थलांतरीत पाण पक्षी सध्या या तलावावर पाहायला मिळत आहे.

Ahmednagar News : अहमदनगर ओबीसी महा एल्गार मेळावा डेफर्ड

Ahmednagar News : अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर आज ओबीसी महा एल्गार मेळावा होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असून या मेळाव्यासाठी दीड ते दोन लाख ओबीसी बांधव येतील असं आयोजकांकडून सांगितलं जात आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी समाजाची ही पहिलीच भव्य सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 

Maharashtra News : तळकोकण गारठलं; सिंधुदुर्गात हुडहुडी भरवणारी थंडी

Maharashtra News : हुडहुडी भरवणारी थंडी सध्या तळकोकणात पडत असल्याने तळकोकण गारठलं आहे. सिंधुदुर्गात गेले दोन दिवस कडाक्याची थंडी पडतेय. काल तापमानात कमालीची घट झाली होती, तर सलग दुसऱ्या दिवशीही तापमानात कमालीची घट झाली आहे. आज 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीमुळे जिल्ह्यातील नागरिकांनी शेकोटीचा आधार घेताना दिसतायत. 15 दिवसांपूर्वी कडाक्याची थंडी पडली होती, त्यानंतर वातावरणात बदल होऊन थंडी गायब झाली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडी सुरू झाल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.

Nashik News : खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्यावर आज न्यायालयात सुनावणी

Maharashtra News Live Updates : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्यावर आज (दि.3 रोजी) नाशिकच्या मालेगाव न्यायालयात सुनावणी होणार असून, खा. राऊत आजच्या सुनावणीला हजर राहतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दि. 2 डिसेंबरला खा. राऊत हे मालेगाव न्यायालयात हजर राहिल्याने न्यायालयाने दिलासा देत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.


काय आहे प्रकरण?


मालेगावचा गिरणा साखर कारखाना वाचविण्यासाठी जमा केलेल्या शेअर्समध्ये मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी दै. सामनामध्ये केला होता. मंत्री भुसे यांनी खा. राऊत यांना नोटीसद्वारे पुरावे सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राऊत यांनी कुठलेही पुरावे सादर न केल्याने मंत्री भुसे यांनी खा. राऊत विरोधात मालेगाव न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला होता.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.