Manoj Jarange-Pati : छगन भुजबळ यांनी कुठेही आंदोलन करू द्या - मनोज जरांगे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 31 Jan 2024 03:04 PM
NCP : माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीच्या १४ प्रवक्त्यांची यादी जाहीर... 

Maharashtra News LIVE Updates:  राष्ट्रवादी काँग्रेसकडून माध्यमांमध्ये पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी १४ प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, संजय तटकरे, मुकेश गांधी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, रुपालीताई ठोंबरे, प्रशांत पवार, मुजीब रुमाणे, ताराचंद म्हस्के -पाटील, सायली दळवी आदींचा समावेश आहे.

Yavatmal : कंत्राटी कर्मचारी संघाचे दोन कामबंद आंदोलन
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्र राज्य बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी संघाच्या नेतृत्वात आरोग्य विभागातील डी.एम.कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. ह्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती डी.एम. कंपनी मार्फत कंत्राटी स्वरुपात जिल्हा महीला व बाल रुग्णालय येथे झालेली आहे. नियुक्ती होऊन दीड वर्षाचा कालावधी झाला मात्र अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांचे मानधन झालेले नाही. याबाबत वैद्यकिय अधिक्षक यांना निवेदने दिली मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याने दोन दिवसांचा संप कर्मचाऱ्यांनी पुकारला.

 
Wardha : वर्ध्यात 2 हजार 700 प्रगणकाद्वारे मराठा कुणबी सर्व्हे

Maharashtra News LIVE Updates: वर्धा जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी घेण्याचा सर्व्हे केला जात आहे. याकामी 2 हजार 700 प्रगणक कामी लावण्यात आले. यात शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. आतापर्यंत 2 लाख 16 हजार कुटुंबाचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. जवळपास 70 टक्के सर्व्हे पूर्ण झाला असून आज हा सर्व्हे पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात एकही मोडी लिपीतील नोंद आढळून आली नाही

Akola : पोवाड्यात अफजलखान वधाचं दृष्य साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावली 

Maharashtra News LIVE Updates: अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात अफजलखान वधाचं दृष्य साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोल्यातील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात हा प्रकार घडलाय. औरंगजेबाच्या वधाचं दृष्य दाखवल्यानं आपल्या भावना दुखानल्याचा आरोप एका विशिष्ट धर्मीय विद्यार्थ्यांनी केला होताय. त्यानंतर नाट्य सादर करणार्या विद्यार्थ्यांना माफी मागण्यास भाग पाडण्यात आलंय. अकोल्यातील रामदास पेठ पोलिसांनी या प्रकरणी पोवाडा सादर करण्याला विरोध करणाऱ्या एका विशिष्ट धर्माच्या तीन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केलेत. यासंदर्भात पोवाडा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलीस तक्रार केली होती. या तिन्ही विद्यार्थ्यांवर धार्मिक भावना दुखावल्याची कलमं लावण्यात आलीयेत. दरम्यान, याप्रकरणी आज अकोल्यातील शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन केलंय. सरकारला निवेदन देत आंदोलकांनी तिन्ही विद्यार्थ्यांच्या अटकेची मागणी केलीये.


 

Eknath Shinde : बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्थसहाय्य प्राप्त

Maharashtra News LIVE Updates: बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्थसहाय्य प्राप्त झाल्याची कबूली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या रुग्णालयावर पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याबाबत कळविले आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत बोगस प्रकरण किंवा शासनाची फसवणूक केली आहे त्याची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे सहाय्यक लेखा अधिकारी संजय तांबे यांनी अनिल गलगली यांस कळविले की डॉ. अनुदुर्ग ढोणी गणपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आंबिवली पूर्व ठाणे या रुगणालयाने बनावट कागदपत्रान्वये अर्थसहाय्य प्राप्त केल्याचे दिसुन आल्याने रुग्णालयातील डॉक्टर , कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्ती यांचा संशय आल्याने पुढील चौकशी करुन आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करणेबाबत पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांना दिनांक. 06.11.2023 च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.


अनिल गलगली यांच्या मते मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी संपूर्ण विवरणासहित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आहे. यामुळे अशी अनेक प्रकरणे बाहेर येतील आणि बोगसगिरीवर आळा बसेल. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना फायदा होईल.

Ahmednagar : जिल्हा न्यायालयासमोर वकिलांचे धरणे आंदोलन

Maharashtra News LIVE Updates: अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने अहमदनगर जिल्हा न्यायालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय...राहुरीच्या आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आणि वकील संरक्षण कायदा लागू व्हावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आलंय...अशा पद्धतीने वकिलांच्या हत्या व्हायला लागल्या तर ही चिंतेची बाब आहे...राज्याचे गृहमंत्री हे वकील आहेत त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून तातडीने या कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्हाला मंत्रालयावर धडक मोर्चा काढावा लागेल असा इशारा वकील संघटनेने दिला आहे.

Manoj Jarange-Pati : छगन भुजबळ यांनी कुठेही आंदोलन करू द्या

Maharashtra News LIVE Updates: छगन भुजबळ यांनी कुठेही आंदोलन करू द्या, कोणी भूमिका बदललेली नाही, सर्व सुरळीत होईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा व्यक्त केलाय. रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनानंतर परत निघालेल्या जरांगे पाटील यांनी पिंपरी चिंचवड जवळ मोशी इथ मुक्काम केला होता. त्या नंतर आज ते निघाले असता त्यांनी सर्व सुरळीत होईल आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल असा दावा केला. 

Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस होतेय कमी

Maharashtra News LIVE Updates:  राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. जानेवारी महिन्यात उन्हाळा जाणवू लागला आहे. उजनी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी उजनी धरणात 50 tmc इतका पाणी साठा कमी आहे..उजनी धरणात मागच्या वर्षी 110 tmc इतका पाणी साठा होता मात्र आज उजनी धरणात सध्या 60 tmc इतका पाणीसाठा आहे..उजनी धरण सध्या मायनस मध्ये आहे..उजनी धरण हे सध्या मायनस 5 टक्के आहे.  

Pune : पुणे विमानतळावरून जाणारी तीन विमाने रद्द

Maharashtra News LIVE Updates: आज पुणे विमानतळावरून जाणारी तीन विमाने रद्द करण्यात आली आहेत. दिल्ली आणि उत्तरेकडील हवामानामुळे फ्लाइट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ऐनवेळी विमान रद्द झाल्याची घोषणा झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. 

Nashik News : गंगा आणि शरयू नदीचा धर्तीवर नाशिकमधे आरती 

Maharashtra News LIVE Updates: गंगा आणि शरयू नदीचा धर्तीवर  शासनाच्या वतीने नाशिकमधे गोदावरी तिरावर आरती केली जाणार आहे.  राज्य सरकारकडून 10 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मात्र आरतीच्या कारणावरून वादाची मालिका थांबायचे नाव घेत नाही,  पुरोहित संघ आज पर्यन्त आरती करत आलेत. दुसरीकडे रामतीर्थ सेवा समिती स्थापन करून आरतीचे अधिकार त्या समितीला दिले जात असल्याने नवा वाद सुरू झालाय, गुढीपाडवाच्या दिवशी आरती सुरू होणार होती.  मात्र प्रत्यक्षात काहीच काम झाले नसल्यान आता नवा मुहूर्त गोदावरी जन्म दिनाचा देण्यात आलाय. त्यातच वादाची शृंखला सुरू असल्याने  त्या दिवसपासून  तरी महा आरतीचा श्रीगणेशा होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय

sunsex todays : अंतरीम अर्थसंकल्पाआधी सेन्सेक्सची उसळी

Union Budget : अंतरीम अर्थसंकल्पाआधी सेन्सेक्सची ६०० अंकांची उसळी तर निफ्टी १८३ अंकांनी वधारला. संथ सुरुवातीनंतर भांडवली बाजारात तेजी आली आहे. 


फेडकडून आज संध्याकाळी पाॅलिसी जाहिर होणार, त्यापार्श्वभूमीवर देखील तेजी आली. फेडकडून व्याजदरात कोणतीही कपात होणार नसली तरी येत्या वर्षभरात व्याजदरात कपातीची संदर्भात काॅमेंट्रीची शक्यता, ज्याचे परिणाम भारतीय भांडवली बाजारावर

Ahmednagar : दोन दिवसात 2 बिबटे जेरबंद...

Maharashtra News LIVE Updates: अहमदनगर जिल्ह्यातील लोणी परीसरात बिबट्यांचा मुक्त संचार असून दोन लहान मुलांना बिबट्याच्या हल्यात आपला जिव गमवावा लागलाय. पंधरा दिवसांपासून बिबट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला जात असून लोणी गावाच्या परीसरात आत्तापर्यंत गेल्या 2 दिवसात 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.


राहाता तालुक्यातील लोणी गावात दहा दिवसापूर्वी एका नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला होता त्यात त्याला आपला जिव गमवावा लागला हि घटना ताजी असतानाच लोणी गावाशेजारी असणा-या सादतपूर परीसरात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलाचा बळी गेलाय.वन विभागाने जवळपास 16 पिंजरे लावले असून ड्रोनच्या सहाय्यानेही बिबट्यांचा शोध घेतला जातोय. आत्तापर्यंत दोन बिबट्यांना जेरबंद केले असले तरीही नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. 

Solapur : चंद्रभागा बनलीय गटारगंगा तर वाळवंट झाले उकिरडा

Maharashtra News LIVE Updates: लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान  असणाऱ्या चंद्रभागेची अत्यंत दयनीय अवस्था बनली असून शासन आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चंद्रभागा गटारगंगा बनलीय तर वाळवंटाचा उकिरडा बनू लागला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जेवढे महत्व आहे तेवढेच चंद्रभागेच्या स्नानाला देखील  महत्त्व आहे. मात्र या चंद्रभागेची अवस्था दयनीय झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये पंढरपूर येथे येवून नमामी चंद्रभागा प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र हा प्रकल्प कागदावरच राहिल्याने चंद्रभागेच्या दुरवस्था झाली आहे. चंद्रभागा सफाईसाठी नगरपालिका आणि मंदिर समितीकडून खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र वारकऱ्यांच्या नशिबी दुर्गंधी असलेल्या पाण्यात स्नान आणि घाणीने भरलेल्या वाळवंटात भजन करण्याची वेळ येत आहे . बेकायदा वाळू उपशावर आधीच वाळवंट उजाड बनले असताना आता त्याचा उकिरडा होऊ लागला आहे.

हिम बिबट्यांची जनगणना

केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच हिम बिबट्यांची जनगणना करण्यात आली. भारतात हिम बिबट्यांची संख्या 718 वर आहे.


सर्वाधिक हिम बिबटे लद्दाखमध्ये, लद्दाखमध्ये ४७७ हिम बिबटे 


उत्तराखंडमध्ये १२४, हिमाचल प्रदेशात ५१, अरुणाचल प्रदेशात ३६, सिक्किम परिसरात २१ तर जम्मू काश्मिरात ९ हिम बिबट्यांची नोंद 


जवळपास १३ हजार किलोमिटर परिसरात हिम बिबट्यांचे सर्व्हेक्षण, ज्यात १ हजार ९७१ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावत नोंदी

Prakash Ambedkar News : महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार!

Maharashtra News LIVE Updates: 2 फेब्रुवारीला मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची 'एबीपी माझा'ला माहिती. वंचित महाविकास आघाडी सहभागी झाली की नाही?, या मुद्द्यावर अजूनही आंबेडकरांचे सूचक मौन. 2 फेब्रुवारीच्या बैठकीनंतर या सर्व प्रश्नांवर भूमिका मांडणार असल्याचं आंबेडकरांची माहिती. काल महाविकास आघाडीने दिलेल्या सहभागाच्या पत्रावर नाना पटोले यांच्या सहीवर आंबेडकरांचं पुन्हा प्रश्नचिन्ह. नाना पटोलेंना जर अधिकारच नसतील तर पत्रावर त्यांच्या सहीला महत्त्व काय?, आंबेडकरांचा सवाल. दोन तारखेच्या बैठकीला फक्त शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निमंत्रणावरून सहभागी होत असल्याची आंबेडकरांची 'एबीपी माझा'ला 'एक्सक्लुझिव्ह' माहिती.

Union Budget 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण सुरु

अर्थसंकल्पीय अधिवेशानात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण सुरु झाले आहे.  भारताची प्रगतीकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितलं.


नारीशक्तीच्या पर्वाला सुरुवात, अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदींची मोठी प्रतिक्रिया

PM Narendra Modi : गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सितारामण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी (Union Budget 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संबोधित केले.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधाकांना टोला लगावला. त्याशिवाय अंतरिम अर्थसंकल्पाविषयी त्यांनी मत व्यक्त केले. नारीशक्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचेही ते म्हणाले. 


या नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी, या संसदेने एक अतिशय सन्मानजनक निर्णय घेतला होता. जो नारीशक्तीला सक्षम करणारा होता.  26 जानेवारी रोजी कर्तव्यपथावर नारी शक्तीचं सामार्थ स्थैर्य, संकल्पशक्ती देशाने पाहिली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, तेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारामण यांचे अंतरिम अर्थसंकल्प हे एक प्रकारे, स्त्री शक्तीच्या  साक्षात्काराचं पर्व होय. 

Nagpur : नागपुरात दोन व्यापाऱ्यांकडून दोन कोटी रुपयांची लूट

Maharashtra News LIVE Updates: नागपुरात दोन व्यापाऱ्यांकडून सुमारे दोन कोटी रुपयांची लूट झाल्याची घटना घडली आहे..  काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या आरंभबिंदू पासून काही अंतरावर कोतेवाडा शिवारात ही घटना घडली आहे. दोन्ही व्यापारी कारने सुरतच्या दिशेने जात असताना पाठलाग करत दुसऱ्या कार ने आलेल्या तीन लुटारूंनी व्यापाऱ्यांना मारहाण करत त्यांच्याजवळची दोन कोटी रुपयांची बॅग हिसकावून नेली. नागपूरच्या हिंगणा पोलीस स्टेशनचे पथक मध्यरात्री पासून घटनास्थळी दाखल झाले असून लुटारूंचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, दोन्ही व्यापाऱ्यांकडून लुटून नेलेली रक्कम हवालाची असल्याची माहिती आहे..

Dhule : धुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 27 टक्के जलसाठा

Maharashtra News LIVE Updates: धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे धुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 13 मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 27.11% पाणीसाठा उपलब्ध असून यामुळे आगामी काळात पाण्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरी एवढा देखील पाऊस झालेला नसल्यामुळे तापी वगळता पांजरा बुराई या नद्या कोरड्याठाक पडल्या असून कमी पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये ही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही जिल्ह्यात बारा लघु मध्यम प्रकल्प असून यातील सोनवद अमरावती प्रकल्पात शून्य टक्के साठा आहे तर उर्वरित प्रकल्पात केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यांचे आराखडा देखील तयार केला असून जून पर्यंत अनेक गावांना टँकर आणि विहिरी अधिग्रहित करावे लागतील या दृष्टीने देखील प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे....


 
maratha reservation मराठा आरक्षण बाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात ओबीसी संघटनांकडून आव्हान

Maharashtra News LIVE Updates: मराठा आरक्षण बाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात ओबीसी संघटनांकडून आव्हान देण्यात आले आहे. ओबीसी वेलफेयर फौंडेशन तर्फे ऍड मंगेश ससाणे यांच्याकडून मुंबई उच्चं न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची  व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी याचिकेच्या माध्यमांतून भूमिका घेण्यात आली आहे. "सागेसोयरे "व" गणगोत "यांच्या प्रतिज्ञा पत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या 26 जानेवारी च्या मसुद्याला ओबीसी संघटनेचे कोर्टात आव्हान


 


 

Maharashtra News LIVE Updates : बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचं वादळ; परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास नकार

Maharashtra News LIVE Updates : राज्यात लवकरच बारावीच्या (HSC Exam) प्रात्यक्षिक परीक्षांना (Practical Exams) सुरुवात होणार आहे. मात्र, त्या आधीच प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्काराचा वादळ घोंगावत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार घालत या परीक्षांसाठीचं साहित्य बोर्डाकडून घेण्यास आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सहकार्य करण्यास नकार दिला आहे.


शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, थकीत वेतनेत्तर अनुदान आणि इतर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे बोर्डाकडून लक्ष दिलं जात नाहीये. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने बहिष्काराचे हे हत्यार उचललं आहे. आम्ही आमच्या शाळा आणि शाळेतील कर्मचारी प्रात्यक्षिक परीक्षांसाठी उपलब्ध करून देणार नाही असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे सध्या तरी प्रात्यक्षिक परीक्षा धोक्यात आल्याचे वक्तव्य त्यांनी केलं आहे. शासनाने लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून जर आमच्या महामंडळाची बैठक लावून लेखी आश्वासन दिले, तर यावर तोडगा निघू शकेल असेही फडणवीस म्हणाले.

Pune News : 15 वर्षाच्या मुलीवर दोघांकडून बलात्कार 

Pune News : धक्कादायक पुण्यात 15 वर्षाच्या मुलीवर दोघांकडून बलात्कार करण्यात आला. पुण्यातील मांजरी परिसरातील घटना घडली. अनुराग साळवी व गणेश म्हात्रे या आरोपींनी आळीपाळीने 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

Wardha News : वर्ध्यातील कचऱ्याकडे शिवसेनेच्या उबाटा गटाने वेधलं लक्ष
Wardha News : वर्धा नगरपालिका हद्दीत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 8 मधील युवा रामराज्य चौक, ठाकरे मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील खुल्या जागेत पसरलेल्या कचऱ्याकडे शिवसेनेच्या उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. वर्धा नगरपालिकेला स्वच्छतेचा प्रथम क्रमांक मिळालाय पण नगरपालिका हद्दीत घाणीचे साम्राज्य कायम आहे. शिवसेनेचे वर्धा विधानसभा प्रमुख नेहाल पांडे यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे.
Amravati News : महाप्रसादाला नेतो म्हणत तरुणीवर सामूहिक अत्याचार
Amravati News : महाप्रसादाच्या निमित्ताने 23 वर्षीय तरुणीला अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मालखेड येथे आणले आणि परत नेऊन सोडण्याच्या बहाण्याने शेतातील झोपडीत नेऊन पाच जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Buldhana News : मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल

Buldhana News : मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्ष यांनी खंडणी मागितली. सोयाबीन, कापूस व्यापाऱ्याला  मागितली 2 लाखांची खंडणी. तर व्यापाऱ्याला मारहाण आणि लोटपाट ही केली. चिखली येथील गोविंद अग्रवाल यांची पोलिसांत तक्रार केली. मनसेचे पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मनसे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर सह 10 ते 15 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल.

Mumbai News : आयआयटी मुंबईत प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यान अचानक रद्द केल्याने विद्यार्थी संघटनांनी नोंदवला निषेध
Mumbai News :  आयआयटी मुंबईत प्रख्यात भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यान अचानक रद्द केल्याने विद्यार्थी संघटनांनी निषेध नोंदविला आहे. आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल या विद्यार्थी संघटनेकडून या सगळ्या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करत व्याख्यानाच्या सामूहिक वाचनासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आला आहे 

 

मुंबई आयआयटीमध्ये  प्रख्यात भाषा तज्ञ गणेश देवी यांचे व्याख्यानाचे 31 जानेवारीला  आयोजन करण्यात आले होते. मात्र, ते रद्द करत असल्याचे ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. प्रा. गणेश देवी हे 'द क्रायसिस इन इंडिया', या विषयावर बोलणार होते. आयआयटीतील व्याख्यानमालेतील हे व्याख्यान होते. यासाठी देवी यांना दोन महिन्यांपूर्वी विचारणा करण्यात आली होती, तर व्याख्यानाचा विषय महिनाभरापूर्वी निश्चित करण्यात आला होता, मिळाली आहे. व्याख्यानाच्या विषयावरून होणाऱ्या वादामुळे आयआयटीने काही दिवसांपूर्वी व्याख्यानांचे विषय मंजूर करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने हे व्याख्यान रद्द केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकारचा निषेध म्हणून मुंबई आयआयटीतील  विद्यार्थी बुधवारी देवी यांनी लिहिलेल्या संबंधित व्याख्यानाचे वाचन आयआयटीत करणार आहेत. आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल या संघटने कडून या सगळ्या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाच्या वाचनासाठी एकत्र यावे असा आवाहन केला आहे
Nashik News : एका वर्षात तब्बल 319 कोटींची वीजचोरी

Nashik News : मालेगाव शहरातील वीजचोरीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मालेगाव शहरात सव्वा लाख वीज ग्राहक असून, पैकी सुमारे 87 हजार ग्राहक हे मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्रात आहेत तर 38 हजार ग्राहक हे मालेगाव बाह्य मतदारसंघातील आहेत..गेल्या तीन वर्षांत 7100 वीजचोरीच्या कारवाया झाल्या आहेत. यामध्ये शंभराहून अधिक अवैध प्लास्टिक कारखाने पॉवर लूम व घरगुती ग्राहकांकडून देखील वीजचोरी होत आहे..आतापर्यंत केवळ 285 जणांवर फिर्याद दाखल झालेली आहे. दरम्यान, वर्षाला तब्बल 319 कोटी रुपयांचे होत असलेले नुकसान कसे भरून निघणार? हा यक्ष प्रश्न कंपनीला सतावत असल्याने वीज कंपनीच अडचणीत आली आहे..पोलिस यंत्रणेचे सहकार्य योग्य प्रकारे मिळत नसल्याने वीज चोरांना आळा घालण्यासाठी कंपनीला सातत्याने अपयश येत असल्याचा आरोप वीज कंपनीकडून करण्यात येत आहे..

Mumbai News : मुंबईत भाजप तयार करणार 5 हजार 'नमो वॉरियर्स'

Mumbai News : मुंबईत भाजप तयार करणार 5 हजार 'नमो वॉरियर्स'


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे 5 हजार युवा कार्यकर्ते मैदानात उतरणार


भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो वॉरियर्स म्हणून निवड होणार


पहिल्या टप्प्यात 100 महाविद्यालयांत 18 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांना संधी


प्रत्येक महाविद्यालयात 50 युवक आणि युवतींची निवड होणार


युवा वॉरियर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी


लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची नवी शक्कल


नमो वॉरियर्सला कामासाठी भाजप मानधन ही देणार

Kolhapur News : मशिदीवर कारवाई करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे पथक दाखल

Maharashtra News LIVE Updates : कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत मध्ये असणाऱ्या बेकायदेशीर मशिदीवर कारवाई करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे पथक दाखल झाले आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त 


लक्षतीर्थ वसाहतीमध्ये तणाव. कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे कारवाई करू नये यासाठी मुस्लिम समाज आक्रमक झाले आहेत. आक्रमक मुस्लिम समाजामुळे कारवाई अद्याप सुरू नाही.

Anil Babar : आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन

Maharashtra News LIVE Updates:  शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे  आकस्मित निधन झालेय. वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  शिवसेना शिंदे गटाचे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झालेय. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी  सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी बाबर यांची  ओळख होती. 

अनिल जयसिंघानीला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Maharashtra News LIVE Updates:  मुख्य आरोपी अनिल जयसिंघानीला हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. एकूण 17 केसेसमध्ये आरोपी असलेल्या जयसिंघानीच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. फडणवीसांकडून खंडणी मागितल्या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी फरार जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली होती. याप्रकरणी त्याची मुलगी अनिष्का आणि भाऊ निर्मल यांना गेल्यावर्षीच कोर्टानं जामीन दिला आहे. 


 

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गारठा कायम राहणार, IMD चा अंदाज काय सांगतो, वाचा सविस्तर

Maharashtra Weather Today : पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील तापमानात घट (Weather Update) होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट (Cold Weather) होण्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. उत्तर भारतासह राज्यात सर्वत्र थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Amravati News : जादूटोणा कायदा सरकार प्रभावीपणे अंमलात आणू इच्छित नाही - श्याम मानव

Maharashtra News LIVE Updates:  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचं सरकारवर गंभीर आरोप.  पोलीसांना स्वतःलाच वाटत नाही, तोपर्यंत जादूटोणा कायदा व्यवस्थित राबविल्या जाणार नाही आणि फडणवीस सरकार हा कायदा प्रभावीपणे अंमलात आणू इच्छित नाही, असे श्याम मानव म्हणाले. 



 श्याम मानव काय म्हणाले ?


सरकारचा सूर काय आहे, सरकार काय करू इच्छिते यानुसार निर्णय घेते आहे हे लक्षात येत आहे. 


सरकारला काय वाटतं यापेक्षा कायद्यात काय बसतं याचा विचार करून पोलीस खात्यात पोलिसच निर्णय घ्यायचे ही प्रक्रिया आता थांबलेली आहे. 


आता एखाद्या पक्षाच्या माणसाने हस्तक्षेप केला नाही तरीही या सरकारच्या मर्जीत आपण राहावं म्हणून काही पोलीस अधिकारी एक्शन घेत नाही.. 


दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाच्या साधा एका नगरसेवकाने देखील एक फोन केला तर जिल्ह्याचं एसपी या पद्धतीने एक्शन धजावत नाही या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे...ही वस्तुस्थिती यानिमित्ताने प्रकर्षाने समोर येत आहे. 


जोपर्यंत अस विचार करणारं सरकार आहे.. जे जाहीरपणे अंधश्रद्धाचं समर्थन करत आहे.. धीरेंद्र कृष्ण महाराज, प्रदीप मिश्रा सारखे बाबांना घेऊन महाराष्ट्रात फिरतात अश्या वातावरणात हा कायदा सक्षमपणे राबविणे कठीण आहे...

Yavatmal -जिनिंगमधील कापसाच्या गंजीला आग

Maharashtra News LIVE Updates:   यवतमाळच्या वणी शहरातील घुग्‍गूस मार्गावर असलेल्‍या नगरवाला जिनिंगमध्‍ये आग लागली. या घटनेत जवळपास शंभर क्विटल कापुस जळून खाख झाला. गोडावुन मध्‍ये ठेवलेल्‍या कापसाने नेमका पेट कशामुळे हे अद्याप स्‍पष्‍ट झाले नाही. ही आग वाहनांच्या सायलेन्सर मधून निघालेल्या ठिणगीमुळे लागल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली त्यामुळे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. 

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात 3 वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर? हे आहे खास कारण

Narendra Modi on Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) तीन वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये नाशिक(Nashik), मुंबई (Mumbai) आणि सोलापूर (Solapur) दौऱ्यावर पंतप्रधान आले होते. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात ते तीन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. आता फेब्रुवारीमध्येही ते तीन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यामध्ये एक दौरा पश्चिम महाराष्ट्रात असेल तर दोन वेळा ते विदर्भात येणार असल्याचं समजतेय. मात्र, अद्याप या दौऱ्याबाबत निश्चिती नाही. सविस्तर वाचण्यासाठी इथं क्लिक करा

Nagpur News : कचरा उचलणारी वाहने जिपीएसवर, नागपूर महानगरपालिकेचा निर्णय

Maharashtra News LIVE Updates:  कचरा उचलणाऱ्या गाड्या नियमित कचरा उचलायला दारावर येत नाही अशी नागपूरकरांची नेहमी तक्रार असायची. त्यातच कचरा उचलण्याच्या नावावर कचऱ्याचे वजन जास्त दिसावे म्हणून कंपनी दगड धोंडे टाकून वजन वाढत होती व शासनाच्या पैशाची लूट आहे ही पण तक्रार वरच्यावर पुढे यायची. याचा रामबाण उपाय म्हणून नागपूर महानगर पालिकेने आपल्या कचरा उचलणाऱ्या वाहनांना जिपीएस मॅनेजमेंट सिस्टीमवर जोडले. सोबतच त्यांच्या कामावर सॉफ्टवेअर च्या माध्यमातून  लक्ष ठेवले जात यामुळे कचरा उचलणारी वाहने कुठे ही धरसोड न करता नीट काम करते की नाही हे पालिकेचे अधिकारी एका ठिकाणावरुन बघू शकतात.

Maharashtra News LIVE Updates: नागपूर जिल्ह्यातील 47 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Maharashtra News LIVE Updates:  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील 47 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. काही दिवसातच लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे.. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलात बदलीचे वारे वाहत असून कालच रात्री राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 48 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.


30 जून 2024 पर्यंत ज्यांना एकाच जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण झाले आहे अशा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून नागपुरातून बहुतांश पोलीस निरीक्षकांची बदली ठाणे किंवा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात झाली आहे. सर्वाधिक पोलीस निरीक्षक पिंपरी चिंचवडला गेले असून इतरांची ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

Maharashtra News LIVE Updates: ठाकरे गटाकडून भावनिक आवाहन

Maharashtra News LIVE Updates:  मतदार राजा 'हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये...तुझं एक मत 'हुकूमशाही' उलथविण्यासाठी' अशा आशयाचे बॅनर ठाकरे गटाकडून डोंबिवलीत लावण्यात आलेत . या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाने नागरिकांना मतदारांना भावनिक आवाहन केल्याचे दिसून येतंय . डोंबिवलीत काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका करत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन नागरिकांना केले होते . त्यानंतर ठाकरे गटाकडून लावण्यात आलेले हे बॅनर आता डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरलाय .

Maharashtra News LIVE Updates: मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल - चंद्रशेखर बावनकुळे
 Maharashtra News LIVE Updates: कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हते, मात्र आता प्रमाणपत्र मिळणे सोपे होईल. ओबीसीमध्ये जे कुणबी नोंदी आहेत, त्याबद्दलचा निर्णय झाला आहे. ओबीसीचे शून्य टक्के आरक्षण कमी होणार नाही, मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळेला महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. 11 फेब्रुवारीच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील अशी शक्यता व्यक्त केली जात असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीचे तिसऱ्या आठवड्यात नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील अशी माहिती समोर आली आहे. 


भाजपच्या एससी सेल (SC Cell ) च्या देशभरातील सुमारे 25000 पदाधिकाऱ्यांचा खास मेळावा/सभा नागपुरात पार पडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपने पक्षाच्या वेगवेगळ्या आघाडी ( Cell ) च्या खास सभा वेगवेगळ्या शहरात घेण्याचे ठरवले आहे.. त्या अंतर्गत भाजपच्या अनुसूचित जाती आघाडी ही खास सभा नागपुरात होणार आहे...

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.