Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...  

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Feb 2024 01:39 PM
Maharashtra News Updates : सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट सापडले; 24 तासांत 2 चोरट्यांना अटक

Maharashtra News Updates : सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट सापडले. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 2 चोरट्यांनी या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिटसह जेजुरीमधून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झालीय. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आलं. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचं समजताच एकच खळबळ माजली होती.

Mumbai News : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकरांचा मोठा दावा, म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध नाही!

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागविण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले. निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीचे कोणते आमदार पात्र आणि अपात्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra News : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित दादा गटाला देण्याच्या निर्णयानंतर जळगावमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

Maharashtra News : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजित दादा गटाचे असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर जळगावमध्ये अजित दादा गटाच्या वतीने जल्लोष करण्यात आला आहे. तर, शरद पवार गटाच्या वतीने काळी फित लावून निदर्शने करण्यात आली आहेत. अजित पवार आणि शरद पवार गटाच्या दोन्ही कार्यकर्त्यांनी आमने-सामने येत राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर एकाच वेळी जल्लोष आणि निदर्शने करण्यात आल्याने वातावरण चांगलंच तापलं होतं. शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार आणि त्यांच्या गटाला गद्दार संबोधित अर्वच्या भाषेत घोषणाबाजी केली. आणि या विषयात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर, दुसरीकडे अजित दादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हा सत्याचा आणि संख्या बळाचा विजय असून संविधानानुसार दिलेला निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra News Updates : गणपत गायकवाड यांनी कळवा पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये केला अन्नत्याग

Maharashtra News Updates : उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाल्या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड या घटनेत नसतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे अन्नत्याग केला असल्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कॅमेरासमोर न बोलण्याच्या अटीवर दिली आहे. 

Maharashtra News : मीरा भाईंदर आणि वसई विरार वासियांसाठी खुशखबर; लवकरच वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

Maharashtra News : मीरा भाईंदर आणि वसई विरार वासियांसाठी खुशखबर आहे. लवकरच वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा त्यांना  मिळणार आहे. याचं कारण भाईंदर ते वसई दीड तासाचा प्रवास आता दहा मिनिटाचा सुखकर होणार आहे. आपली वाहने बोटीतून टाकून पुढील प्रवास करू ते करु शकतात. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने भाईंदर आणि वसई येथे तयार झालेल्या रो रो जेट्टीची पाहणी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत नुकतीच करण्यात आली आहे. या जेट्टी रो-रो सेवेसाठी सज्ज आहेत. लवकरच ही सेवा सुरू करा असे पत्र महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे खासदार राजन विचारे यांनी केले आहे.

Mumbai News : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज आयोजित; विविध विद्याशाखांतील 1 लाख 51 हजार 648 स्नातकांना पदव्या

Mumbai News : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज आयोजित करण्यात आला असून, विविध विद्याशाखांतील 1 लाख 51 हजार 648 स्नातकांना पदव्या. 428 स्नातकांना पी. एचडी तर 24 पदके प्रदान केली जाणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. म. जगदीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती असेल. समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस भूषवणार आहेत. तर, अतिथी म्हणून राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra News Updates : फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचा पक्षी मेळावा शासनाच्या निधीतून; अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप

Maharashtra News Updates : भाजपच्या मेळाव्यासाठी शासकीय निधीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात पारडसिंगा येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या महिला मेळाव्यासाठी महिला बचत गटाच्या महिला, तसेच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी प्रत्येक गावातून 100 महिला आणाव्यात असा पत्रच काटोलच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना पाठवलं आहे. तसेच या 100 महिलांच्या ने-आण करण्यासाठी लागणारा आवश्यक खर्च आणि वाहन खर्च ग्रामपंचायतीच्या स्वनिधीमधून देण्यात यावं असा आदेशही गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्राच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. भाजपने राजकीय मेळावा घ्यावा. मात्र, तो शासनाच्या निधीतून घेऊ नये असा टोलाही अनिल देशमुख यांनी लगावला आहे.

Buldhana News : तुपकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; जिल्हावासियांचं लक्ष

Buldhana News : लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केल्याने सत्ताधारी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून मला तुरुंगात टाकण्याचा डाव. - रविकांत तुपकर


शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी आणि शेतमालाला भाव मिळण्यासाठी अनेक आंदोलने केलीत. या आंदोलनातील गुन्ह्यात मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला असून या महत्वाच्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. रविकांत तुपकरांचा जामीन कायम राहतो का रविकांत तुपकर पुन्हा कारागृहात जातात हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान मी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांचा जनाधार संपलेला असल्याने ते मला तुरुंगात डांबण्याचा डाव रचत आहे. मात्र, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार...! अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे. दरम्यान आज बुलढाणा न्यायालयात रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी दुपारी बारानंतर होण्याची शक्यता आहे.

Maharashtra News : बारामतीत अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने जल्लोष सुरु

Maharashtra News : बारामतीमध्ये कालच्या निकालानंतर अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे. ज्यांना पक्ष चिन्ह मान्य असेल ते आमच्याबरोबर येऊ शकतात असं अजित पवार म्हणालेत. 

Maharashtra News : मनमाडला डॉ.आंबेडकर पूर्णाकृर्ती पुतळ्याचे आज होणार लोकार्पण; हेलिकॉप्टरने होणार पुतळ्यावर पुष्पवृष्टी

Maharashtra News : नाशिकच्या मनमाडमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृर्ती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जगविख्यात पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या पुतळ्याचे आज लोकार्पण संपन्न होणार आहे. यावेळी हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्यानिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून निळे ध्वज, पताका, निळ्या आकाशकंदीलाने अवघे शहर सजले आहे. गेल्या 40 वर्षांपासून पूर्णाकृर्ती पुतळ्याची मागणी असलेला प्रश्न मार्गी लागल्याने डॉ. आंबेडकर अनुयायांनी समाधान व्यक्त केले.

Amravati News : अमरावतीवरून अयोध्येला आस्था रेल्वे रवाना...

Amravati News : अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावरून प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाकरिता 'आस्था स्पेशल ट्रेनने' अयोध्येच्या दिशेने हजारो रामभक्त आज पहाटे पाच वाजता रवाना झाले. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी रामभक्तांशी संवाद साधला. फलाटावर लागलेल्या प्रत्येक बोगीमध्ये जाऊन त्यांनी राम भक्तांची आस्थेने विचारपूस केली. सर्वांना प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अयोध्या स्पेशल ट्रेनच्या चालकांचा त्यांनी सत्कार केला. या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे रेल्वे खात्याचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस खात्याचे अधिकारी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, महिला कर्मचारी, आरक्षण प्रक्रियेत काम करणारे कर्मचारी यांचे डॉ. अनिल बोंडे यांनी आभार देखील मानले. राम भक्तांसाठी भाजपाकडून या रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. यासाठी हजारो श्री राम भक्त रात्री 11 वाजताच अमरावती रेल्वे स्थानकावर दाखल झाले. यावेळी त्या ठिकाणी रात्रभर भजन, सुंदरकांड आणि हनुमान चालीसा यांचं पठण करण्यात आलं. यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. 

Ratnagiri News : लांजा, रत्नागिरी- विहिरीत पडलेल्या बिबट्याची 16 तासांनंतर झाली सुटका

Ratnagiri News : लांजा, रत्नागिरी- विहिरीत पडलेल्या बिबट्याची 16 तासांनंतर सुटका करण्यात यश आलं आहे. वनविभागाच्या माध्यमातून बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू आँपरेशन करण्यात आले आहे. करंजारी या ठिकाणी बिबट्या पाण्यात पडल्याची घटना घडली. विहिर खोल असल्या कारणाने बिबट्याला वर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या. अखेर पिंजऱ्यात भक्ष्य ठेवून बिबट्याची वनखात्याने सुटका केली. 

Yavatmal News : यवतमाळ शहरातील कळंब चौक भागात गोळी झाडून तरुणाची हत्या 

Maharashtra News Updates : यवतमाळ शहरातील कळंब चौक भागात गोळी झाडून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. क्षुल्लक वादातून कळंब चौकात दुचाकीवरून आलेल्या 3 जणांच्या टोळक्याने गोळी झाडून हत्या केली आहे. अवधूत वाडी पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. शादाब खान रफिक खान (22) असे मृत तरूणाचे नाव असून आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.  


 


 

Ratnagiri News : कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी

Maharashtra News : कोकणातल्या रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 15 फेब्रुवारी रोजी बूथ कार्यकर्ता संमेलन होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इतर प्रमुख पदाधिकारी नेते हजर राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, लांजा राजापूरसह आणखी इतर ठिकाणी बूथ कार्यकर्ता संमेलन होणार आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरूण सध्या शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये वाद. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची नावे आघाडीवर तर, नारायण राणे यांच्या नावाची देखील चर्चा होणार आहे. 

Maharashtra News Updates : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानची आज चौकशी होणार आहे; विधी आणि न्याय विभागाचे देवस्थानला पत्र

Maharashtra News Updates : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानची आज चौकशी होणार आहे; विधी आणि न्याय विभागाचे देवस्थानला पत्र. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी  विधान परिषदेच्या अधिवेशनात चौकशीची मागणी केली होती. शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली होती. आज सकाळी 11 वाजता विश्वस्तांचे लेखी जबाब घेतले जाणार. 


 

Maharashtra News : जायकवाडी धरणावर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात हजारोंच्या संख्येने मच्छीमार एकत्र

Maharashtra News : जायकवाडी धरणावर प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात हजारोंच्या संख्येने मच्छीमार आज आपल्या कुटुंबासह पैठणच्या जायकवाडी धरणावर एकत्र आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दुपारी 12 वाजता आंदोलनाचा वेळ असताना पहाटे पाच वाजताच आंदोलक धरणावर जाऊन धडकले असून, याबाबत प्रशासनाला देखील कोणतीही कल्पना नसल्याचे समोर येत आहे. जायकवाडी धरणावर होणारा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची प्रमुख मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

Maharashtra News Updates : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर

Maharashtra News Updates : आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने 7 फेब्रुवारीपासून (आजपासून) निवासी डॉक्टरांकडून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. त्यामुळे याचे परिणाम आरोग्य यंत्रणेवर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेत बैठक देखील झाली. मात्र, पुन्हा एकदा फक्त आश्वासनच मिळत असल्याने निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.