Raosaheb Danve: शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) फुटणार असल्याच्या फक्त अफवा असून, शिंदे गट फुटण्याआधी राष्ट्रवादी-काँग्रेसमधील आमदार पक्ष सोडून पळतील. तर शिंदे गटाच्या एकही आमदाराला आम्ही भाजपमध्ये (BJP) प्रवेश देणार नसल्याचं वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे. जालना येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना दानवे असे म्हणाले. तर याचवेळी अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील दानवे यांनी निशाना साधला. 


यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, शिंदे गटातील आमदार फुटणार असल्याचा जोपर्यंत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष दावा करणार नाही, तोपर्यंत त्यांचे आमदार त्यांच्याकडे राहतील याची शक्यता कमी आहे.  राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार पळण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार फुटणार अशा अफवा त्यांच्याकडून सोडल्या जात असल्याचा दावा दानवे यांनी केला. तर शिंदे गट फुटण्याआधी राष्ट्रवादी-काँग्रेसमधील आमदार पळतील असा दावाही रावसाहेब दानवे यांनी केला. 


शिंदे गटाचा एकही आमदार भाजपमध्ये घेणार नाही...


पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, आम्ही कोणताही पक्ष फोडणार नाही किंवा सरकार पाडणार नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. जरी शिवसेनेने आम्हाला धोका दिला असला तरीही, त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे. शिवसेनेच्या विरोधात पडलेल्या उमेदवाराला गेल्या सरकराने निधी देऊन ताकद देण्याचं काम केलं. त्यामुळे नाराज शिवसेना आमदारांनी उठाव केला. त्यानंतर राज्यात भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे शिंदे गटाच्या एकही आमदाराला आम्ही भाजपमध्ये घेणार नाही. आम्ही दोघेही एकत्र असून,सरकार चालवत आहे आणि आम्हाला हे सरकार पुढे चालवायचं आहे, असेही दानवे म्हणाले. 


खोतकर आणि माझ्यातील कटुता संपली...


शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि माझ्यातील कटुता आमचे नवीन सरकार येताच संपली आहे. आतापर्यंत जे झालं ते त्यांनी माझ्या झोळीत टाकले आणि मी त्यांच्या झोळीत टाकले आहे. त्यामुळे तुम्ही आता हा विषय ताणू नका, आमच्यातील कटुता संपली असल्याचे त्यांनी आणि आता मी सुद्धा जाहीर करतो असे दानवे म्हणाले. मात्र या राज्यातील राजकारणाचा सद्या कुणीच कोणताही अंदाज लावू नका, राजकीय परिस्थिती जशीजशी निर्माण होईल त्याप्रमाणे आमचे वरील नेते निर्णय घेतील. वरील जो निर्णय असेल तो आम्ही कार्यकर्ते म्हणून पाळू असेही दानवे म्हणाले. 


तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात...


आगामी निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना दानवे म्हणाले, हा संख्याबळाचा खेळ आहे. जर राष्ट्रवादी स्वबळावर लढली आणि त्यांची संख्याबळ अधिक असेल तर त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो. लोकशाही असून, लोकशाहीने ज्यांच्या बाजूने जास्त लोकं तो राजा असतो. त्यामुळे माझ्या आणि त्यांच्या बोलण्याने कोणेही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे दानवे म्हणाले. 


आदित्य ठाकरेंवर निशाना...


आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका केली जात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना दानवे म्हणाले की, वयाचा एक भाग असतो, आदित्य ठाकरे यांनी वयाप्रमाणे वक्तव्य केले तर भाजपचे कोणतेही नेते त्यांच्यावर टीका करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी उठावं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल पातळीसोडून बोलणं अयोग्य असल्याचं दानवे म्हणाले.