औरंगाबाद : मशिदीवरील लाऊडस्पीकर उतरवा अन्यथा 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 तारखेनंतर मशिदीसमोर दुप्पट आवाजात चालिसा लावणार, असा राज ठाकरेंनी इशारा आज औरंगाबाद येथील सभेत दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लीम समाजानं प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असे आवाहन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भोंगे लावण्याचे आवाहन केले. स्वत: मात्र अयोध्येला जाणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः भोंगे उतरविण्याच्या आंदोलनात सहभागी होणार का? असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.नेत्यांचे अनुकरण जनता करत असते. त्यामुळे नेत्यांनी तरूणांना चांगली दिशा द्यायला हवी. सर्वोच्च न्यायालयात जा, रस्त्यावर असे निर्णय होऊ शकत नाही, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, असे देखील ते म्हणाले.
इम्तियाज जलील म्हणाले, भाजपच्या इशाऱ्यावर सध्या राज ठाकरे काम करत आहे. भाजप काळात भोंगे उतरविले का उतरवले नाही. आता सगळे सुरळीत चालू आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नये. कोरोना काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आपल्याला एक बोनस लाईफ मिळाली आहे. कोरोना काळात आपण औषधांसाठी भांडत होतो आता भोंग्यांसाठी भांडतोय.
राज ठाकरेंवर कारवाई करा, आपची मागणी
तर राज ठाकरेंवर कारवाई करा अशी मागणी आम आदमीपक्षाने केली आहे. राज ठाकरेंच्या धमक्यांमुळे राज्यातील शांतता, सुरक्षा धोक्यात आलीय. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.
संबंधित बातम्या: