अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्रच थैमान घातले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कोरोनवर मात करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते हे अहमदनगर जिल्ह्यातल्या एक कर्मचाऱ्याने दाखवून दिले आहे. नगर परिषदेत काम करणाऱ्या रशीद शेख या कर्मचाऱ्याने भाजी विक्री करणाऱ्या आपल्या आईवरच कारवाई केली आहे. 

पाथर्डी तालुक्यात कोरोनामुळे भाजी विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे नगर परिषदेचे पथक बंदी असताना भाजी विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गेले. यावेळी पथकात असलेल्या रशीद शेख याची आई बेगम रफीख शेख या भाजी विक्री करत होत्या. यावेळी कोणताही विचार न करता रशीद शेख यांनी आपल्या आईच्या पुढे असलेल्या भाजीच्या टोपल्या उचलून कचरा गाडीत टाकल्या आणि कारवाई केली. 

नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आल्याचे रशीद शेख याने दाखवले आणि बंदी असतानाही भाजी विक्री करणाऱ्या आपल्याच आईवर कारवाई करत एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. त्याच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी कोट्यवधीचा दंड वसूल केला आहे. पोलीस कारवाई करत असूनही काही बेफिकीर नागरिक अजूनही नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत.