Chhatrapati Sambhaji Nagar News: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, या मुख्य मागणीसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) विविध संघटनांच्यावतीने जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत घोषणाबाजी करण्यात येत आहे. परंतु एका शिक्षक संघटनेने संपातून माघार घेतल्याने त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये बघावयास मिळाले. संपावरून दोन शिक्षक संघटना आमनेसामने आल्याने शिक्षक आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पहावयास मिळाले. काही संघटनांच्या प्रतिनिधींनी मध्यस्थी केल्याने हा वाद संपुष्टात आला.


महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, शिक्षक समिती, आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, शिक्षक भारती, राज्य मिनिस्ट्री केडर ग्रुप, अभियंता संघटना, ग्रामसेवक युनियन, शिक्षक सेना, राष्ट्रवादी शिक्षक संघ, शिपाई वर्गीय संघटनांच्या वतीने जिल्हा परिषदेत दोन दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या संपातून पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने माघार घेतली आहे. जुनी पेन्शन योजना राबवण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सकारात्मक असल्याने ती लागू करण्याबाबत सरकारने अभ्यास समिती स्थापन केली आहे. यासाठी वेळ देण्यास शिक्षक संघाने तयारी देत या संपातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. 


शिक्षक संघटनांचे कार्यकर्ते आमनेसामने आले 


परंतु, याचे पडसाद बुधवारी (15 मार्च)  रोजी बघावयास मिळाले. शिक्षक संघाच्या भुमिकेबद्दल अनेक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी टीका केली. शिक्षक सेनेचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख महेश लबडे यांनी शिक्षक संघाच्या भुमिकेबद्दल आक्षेप घेत त्यांची माघार चुकीची असल्याचे स्पष्ट केले. या दरम्यान व्यक्तिगत टीका होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी आक्षेप घेत व्यक्तिगत टिकाटिप्पणी न करण्याची विनंती केली. चर्चा सुरू असतानाच दोन्ही संघटनांचे कार्यकर्त्ये आमनेसामने आले अन् त्यांच्यात वाद निर्माण झाला. आंदोलनाला वेगळेच वळण येत असल्याचे निदर्शनास येताच शिक्षक भारतीचे सुभाष महेर, बिजू मारग, कर्मचारी महासंघाचे प्रदीप राठोड, मध्यवर्ती संघटनेचे संजय महाळंकर, आदर्श शिक्षक समितीचे दिलीप ढाकणे यांनी मध्यस्थीची भुमिका बजावली. 


व्हिडीओ देखील समोर...


दरम्यान, समज-गैरसमज दूर झाल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या दोन्ही संघटनांच्या आक्रमक भुमिकेमुळे जिल्हा परिषदेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमकी काय झाले? हे जाणून घेण्यासाठीही अनेकांनी धाव घेतली होती. तर या सर्व घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! अखेर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात